Angry bus driver consumes poison in Bhandara district | भंडारा जिल्ह्यात नाराज बस चालकाने केले विषप्राशन; प्रकृती चिंताजनक
भंडारा जिल्ह्यात नाराज बस चालकाने केले विषप्राशन; प्रकृती चिंताजनक

ठळक मुद्देएसटी आगार व्यवस्थापकांच्या कक्षात घडली घटनातुमसरची घटनाउपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कर्तव्यावर उशिरा आल्याने ड्युटी लावली नाही म्हणून संतप्त झालेल्या एका एसटी चालकाने चक्क आगार व्यवस्थापकांच्या कक्षात विष घेतले. ही धक्कादायक घटना तुमसर येथे मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. चालकाची प्रकृती चिंताजनक असून तुमसर उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
संजय वैद्य (५२) रा.खापा ता.तुमसर असे एसटी चालकाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी त्यांची शालेय सहलीच्या बसवर ड्युटी लावण्यात आली होती. मात्र ते आगारात उशिरा आले. त्यामुळे आगार व्यवस्थापकांनी त्यांना दुसऱ्या बसवर ड्युटी लावण्यास नकार दिला. चालकाने वारंवार विनंती करूनही आगार व्यवस्थापक त्यांचे ऐकून घेत नव्हते. त्यामुळे रागाच्या भरात संजय वैद्य यांनी चक्क व्यवस्थापकाच्या कक्षातच विष घेतले. हा प्रकार लक्षात येताच आगार व्यवस्थापक युधिष्ठीर रामचौरे, आगार नियंत्रक रचना मस्करे यांनी इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने संजयला तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या घटनेने तुमसर आगारात एकच खळबळ उडाली आहे. 
दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारत सर्व बसेस आगारात आणून उभ्या केल्या. त्यामुळे एसटीची वाहतूक ठप्प झाली.

Web Title: Angry bus driver consumes poison in Bhandara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.