अन् शिक्षकाने फुलविली वेलवर्गीय पिकांची शेती
By Admin | Updated: September 1, 2015 00:34 IST2015-09-01T00:34:46+5:302015-09-01T00:34:46+5:30
शासनाच्या विविध योजनांचा लाभ, कृषी विभागाच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन व सहकार्य यातून न परवडणारी शेती, अर्ध्या एकरातही लाखाचे उत्पन्न कसे मिळवून देते,

अन् शिक्षकाने फुलविली वेलवर्गीय पिकांची शेती
दीड एकरात ३.७५ लाखांचा शुद्ध नफा : शासकीय योजना व तज्ज्ञांचे मार्गदर्शन ठरले वरदान
युवराज गोमासे करडी (पालोरा)
शासनाच्या विविध योजनांचा लाभ, कृषी विभागाच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन व सहकार्य यातून न परवडणारी शेती, अर्ध्या एकरातही लाखाचे उत्पन्न कसे मिळवून देते, याचे उत्तम उदाहरण म्हणून मुंढरी खुर्द येथील प्रगतिशिल शेतकरी, शिक्षक सेवाराम रामा गोंधुळे यांच्या कारल्याच्या शेतीकडे पाहिले जात आहे. ठिंबक सिंचन, प्लास्टिक आच्छादन, मांडव पध्दती, योग्य नियोजन व मार्गदर्शनाच्या भरवश्यावर अर्ध्या एकरात ४ लाखांचे उत्पन्न घेऊन २ लाख शुध्द नफा घेण्याचा मानस आहे.
मोहाडी तालुक्यातील मुंढरी खुर्द येथील सेवाराम राम गोंधुळे (४२) पेशाने शिक्षक असून आठ किमी अंतरावरील जि.प. प्राथमिक शाळा नवेगाव (बुज) येथे कार्यरत आहेत. गोंधुळे यांचेकडे मुक्त दीड एकर शेती असून या अगोदर धानाची लावगड करायचे. खर्च वजा जाता ८ ते १० हजाराचा नफा त्यातून मिळायचा. शेतीत राबायचे नाही, या विचारात सेवाराम असतांना त्यांना साथ मिळाली कृषी सहायक विश्वनाथ कवासे, कृषी पर्यवेक्षक निमचंद्र चांदेवार यांची आधुनिक तंत्रज्ञान व प्रायोगिक शेती करण्याचा सल्ला देऊन त्यांचे मनपरिवर्तन करुन त्यांच्यातील गळालेला विश्वास वाढविण्याचे काम त्यांनी केले. अल्पावधीत यशस्वी व प्रयोगशिल शेतकरी त्यांनी घडविला.
ठिंबक सिंचन, मल्चिंग व मांडव पध्दतीने शेती करणारे ते तालुक्यातील पहिले शेतकरी ठरले आहेत. तर शिक्षकाची नोकरी करुन शेतीत राबणारे ते दुसरे शिक्षक ठरले आहेत. यासाठी महादेव गोंधुळे यांची मदत लाभत आहे.
दवडीपार (करडी) येथील शिक्षक सतीश उजवणे यांनी कुकुटपालन, मच्छीपालन व शेती कसण्यासाठी मागील वर्षी नोकरी सोडली आणि ते शेतीत राबत आहेत.
सेवारामने कृषी विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत अनुदानावर ठिंबक सिंचन व मल्चींग एक एकरात करवून घेतली. अर्धा एकरात कारल्याचे, अर्धा एकरात चवडी शेंगा व वांग्याचे पिक लावले. कारल्याच्या पिकासाठी व्हिएनआर २८ या जातीची निवड केली.
प्लास्टिक आच्छादनावर लागवड करुन ठिंबक सिंचन संप पसरविले. ड्रिप ५४$ बाय २.५ फुटावर बरविले. अर्धा एकरात कारल्याचे २००० झाडे लावली. बास व प्लास्टिक सुतळीने मांडव तयार केले. जून महिन्यात लागवड झालेल्या कारल्याने आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून उत्पन्न देण्यास सुरुवात केली आहे. दररोज २ क्विंटल कारल्याचा तोळा होत असून पालोरा, मुंढरी, देव्हाडा, कोका, नवेझरी व अन्य आठवडी बाजारातून विक्री केली जात आहे. ठोक भाव २० रुपये मिळत असून चिल्लर विक्री ४० रुपये प्रतिकिलो आहे. सुमारे ३ ते ४ महिन्याचे पीक असून जवळपास २०० क्विंटल कारल्यातून ४ लाखाचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज शेतकऱ्याचा आहे.
यासाठी ९० हजार रुपये ठिंबक सिंचन, १६ हजार मल्चींग, खते, बि-बियाणे, औषधी, मशागत व मजुरी आदींसाठी जवळपास २ लाखाचा खर्च अपेक्षीत असून २ लाखाचा शुध्द नफा अर्धा एकरातून मिळण्याचा कयास आहे.