कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा बिगूल वाजला
By Admin | Updated: July 27, 2015 00:50 IST2015-07-27T00:50:25+5:302015-07-27T00:50:25+5:30
येत्या ६ सप्टेंबरला होऊ घातलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा बिगूल वाजला
अर्जासाठी फिल्डींग : निवडणुकीला ना आचारसंहितेचे बंधन, ना खर्चाची मर्यादा
लाखनी : येत्या ६ सप्टेंबरला होऊ घातलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. इच्छुकांनी उमेदवारी अर्जासाठी फिल्डींग लावणे सुरू केले आहे. काहींना आपल्या उमेदवारीची शाश्वती आहे. तर काही आपल्या नेत्यांच्या आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत.
लाखनी बाजार समितीच्या निवडणूकीची अधिसूचना जाहीर होताच जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाची तारीख ६ सप्टेंबर निश्चित केली. या तारखेला गोपाळकाला उत्सव येत असल्याने शेतकऱ्यांशी निगडित सण आहे. बाजार समितीच्या या निवडणुकीला ना आचारसंहितेचे बंधन ना खर्चाची मर्यादा. हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे. या बाजार समितीच्या निवडणूकीत २,४८४ मतदार आपला हक्क बजावून १९ संचालक निवडणार आहेत. बाजार समितीची निवडणूक कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम १९६३ नियम १९६७ नुसार घेण्यात येते. सहकार कायद्याचे नियम यास लागू होत नाही. सहकार क्षेत्रात वावरणारे दिग्गज नेते या निवडणुकीत सहभागी होत असले तरी बाजार समितीचे नियम व निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे या निवडणुकीला आचारसंहिता व खर्चाचे बंधन लागू होत नाही. त्यामुळे धनदांडग्या व वजनदार व्यक्तींना ही निवडणूक खूपच सोपी आहे.
सहकारी संस्थांच्या निवडणूका सहकार कायद्यानुसार होतात. त्याकरिता सहकार आयुक्त व त्यांच्या निर्देशानुसार निवडणूक घेणे बंधनकारक असतात. त्यांना निवडणूक आयोगाच्या नियमावलीचे बंधन असते. मात्र, बाजार समित्या या समिती कायद्याखाली पंजीबद्ध असल्याने या निवडणूकांना निवडणूक आयोगाची आचारसंहिता लागू होत नाही. त्यामुळे खर्चाचे विवरण देणे हे देखील उमेदवारांना बंधनकारक राहत नाही.
सहकार क्षेत्रातील कोणत्याही संस्थांना उलाढालीपेक्षा बाजार समित्याचा लेखा-जोखा मोठा असतो. त्यामुळे समिती निवडणूकीकरीता नेत्यांना आकर्षण अधिक असते. साहजीकच या निवडणूका साधारण वातावरणात होवू शकत नाही. आचारसंहिता व निवडणूक खर्चाची बाब सोडली तर निवडणूकीतील नियमाप्रमाणे सर्वच घरातील उमेदवार संचालक पदाकरिता निवडणूक लढवू शकतात.
२,४८४ मतदार निवडणार संचालक
सेवा सहकारी संस्था मतदार संघातून ११ संचालक निवडून द्यायचे आहेत. त्यात सर्वसाधारण-७, महिला २, इतरमागास १, विमुक्त भटक्या जाती-जमाती १ यात एकूण १,२०४ मतदार आहेत. ग्राम पंचायत मतदार संघातून सर्वसाधारण २, अनुसूचित जमाती १, आर्थिकदृष्ट्या दुर्बल १ असे चार उमेदवार देण्याची जबाबदारी या मतदार संघातील १,०८० मतदारांवर आहे. ११६ मतदार व्यापारी अडते मतदार संघातून २ संचालक तर १० मतदार हमाल-व्यापारी मतदारसंघातून १ संचालक निवडून देणार आहेत.
बाजार समित्यांच्या निवडणुकांना स्थगनादेश
भंडारा : सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला असला तरी ज्या बाजार समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला नाही, अशा बाजार समितींच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे. त्यामुळे या निवडणुका आता सहामहिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर होणार आहेत. सध्या पावसाळा सुरु झाला असल्याने शेतकरी कामात व्यस्त आहेत. ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील कलम १४(३)(ए) च्या तरतुदीनुसार टंचाईदुष्काळ, पूर, आग किंवा इतर कोणत्याही आपत्तीमुळे राज्य विधानमंडळाचा किंवा संसदेचा अथवा एखाद्या प्राधिकरणाचा कोणताही निवडणूक कार्यक्रम एकाचवेळी आल्यामुळे बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत. बाजार समिती निवडणुकीसंदर्भात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्यासंदर्भात निश्चित आदेश दिले आहेत. ज्या बाजार समित्यांच्या निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकारी किंवा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी कृषी पणन नियम १९६७ च्या नियम ४३(१) खाली निवडणुकीसंदर्भात आदेश काढले आहेत.