रसायनयुक्त पाण्यामुळे शेतजमीन निकामी

By Admin | Updated: January 19, 2016 00:29 IST2016-01-19T00:29:08+5:302016-01-19T00:29:08+5:30

एम.आय.डी.सी. राजेगाव (गडेगाव) येथे असलेल्या वरमबायो एनर्जी कारखान्यातील केमिकलयुक्त सांडपाणी शेतामध्ये शिरत असल्याने ...

Agricultural land degradation due to chemical water | रसायनयुक्त पाण्यामुळे शेतजमीन निकामी

रसायनयुक्त पाण्यामुळे शेतजमीन निकामी

शेतकरी संकटात : चौकशी करुन प्रतिवर्ष ५० हजार रुपये नुकसानभरपाईची मागणी, प्रकरण वरमबायो एनर्जी कारखान्याचे
भंडारा : एम.आय.डी.सी. राजेगाव (गडेगाव) येथे असलेल्या वरमबायो एनर्जी कारखान्यातील केमिकलयुक्त सांडपाणी शेतामध्ये शिरत असल्याने शेतजमीन निकामी झालेली आहे. शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून न्याय मिळावा, यासाठी शेतकरी जिल्हा प्रशासनाकडे धावाधाव घेत आहे.
वरमबायो एनर्जी कारखान्यालगत राजेगाववासीयांची शेकडो एकर शेती आहे. हा कारखाना २००८ पासून सुरु करण्यात आला. येथून केमीकलयुक्त सांडपाणी शेतकऱ्यांच्या शेतात नालीद्वारे येत आहे. त्यामुळे २००८ मध्ये शेतकऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनाची भेट घेऊन समस्या सोडविण्याची मागणी केली. त्यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियमन मंडळ व जिल्हा प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आली. तेव्हा कारखाना व्यवस्थापनाने सांडपाणी येणे बंद केले होते. मात्र त्यानंतर आजपर्यंत कारखान्यातील सांडपाणी शेतात येत आहे.
राजेगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती कारखान्यालगत असून या शेतीच्या माध्यमातून ते उदरनिर्वाह करीत होते. पावसाळ्यात धानाचे पिक घेतले जाते. त्यानंतर रब्बी पिक, हरभरा, गहू, पोपट, उडीद, मुग आदी पिके घेतली जातात. परंतु कारखाना आरंभ झाला तेव्हापासून सांडपाण्यामुळे पिके नष्ट होत आहेत. कर्ज काढून दरवर्षी शेती कसली जात आहे. कारखान्यातील पाण्यामुळे उत्पादन होत नाही. सांडपाण्यामुळे पिके जळत आहेत. दुषित पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी कारखान्याच्या आवारात शोषखड्डा तयार केलेला नाही. हेतूपुरस्सर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दूषित पाण्याचा प्रवाह सुरु आहे.
अनेकदा तक्रार करूनही अधिकारी व व्यवस्थापनाने मोका तपासणी केलेली नाही.असे सतत सुरु असले तर शेतजमिन निकामी होत आहे. जिल्हा प्रशासनाने व प्रदूषण मंडळाने कारखाना व्यवस्थापनाला सांडपाण्याची विल्हेवाट लावून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये अशी उपाययोजना करण्याची गरज आहे. यापूर्वी सन २००९ मध्ये प्रदूषण मंडळाचे अधिकाऱ्यांनी भेट देऊन चौकशी अहवाल तयार केला होता. त्यानंतरही कारखान्याने सांडपाणी शेतीमध्ये जाणे बंद केले नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पिकाचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी कायमचा उपाय शोधावा. नुकसानभरपाईपोटी शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रतीवर्ष देण्यात यावी, अशी मागणी राजेगाव येथील शेतकरी अशोक वासुदेव शेंडे व राजेगाववासीयांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Agricultural land degradation due to chemical water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.