उपविभागीय कार्यालयात शेतीची प्रकरणे रखडली
By Admin | Updated: March 18, 2015 00:43 IST2015-03-18T00:43:30+5:302015-03-18T00:43:30+5:30
लोकाभिमुख व शेतकरी हिताचे शासन म्हणून कांगावा करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडे गेल्या सहा महिन्यापासून भोजापूर ...

उपविभागीय कार्यालयात शेतीची प्रकरणे रखडली
पवनी : लोकाभिमुख व शेतकरी हिताचे शासन म्हणून कांगावा करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडे गेल्या सहा महिन्यापासून भोजापूर येथील शेतकऱ्याचे वर्ग २ चे वर्ग १ करण्याचे प्रकरण प्रलंबित आहे. शेतजमीन वर्ग १ केल्याशिवाय शेतीचे विक्रीपत्र होवू शकत नाही. मुलीचे लग्न, शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडण्याची क्षमता न राहिल्याने शेतीची विक्री करणे हा एकमेव पर्याय त्या शेतकऱ्यांकडे आहे. परंतु उपविभागीय कार्यालय भंडारा येथे प्रकरण प्रलंबित असल्याने शेतजमीन विक्रीचा पर्याय सुद्धा राहिलेला नाही. परिणामी आत्महत्येचा मार्ग अवलंबवावा लागेल असे धमकीवजा पत्र शेतकऱ्याने जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडे पाठविले आहे.
पवनी तालुक्यातील भोजापूर शिवारातील पहनं ३१ गट क्र. १२०, १२१, १२३ ही शेतजमीन वर्ग ए मध्ये असलेले शेतकरी गंगाधर दशरथ लकडस्वार यांनी वर्ग २ ची जमीन वर्ग १ करण्यासाठीचा महिन्याभरापूर्वी उपविभागीय अधिकारी भंडारा यांचे कार्यालयाकडे पाठविला. प्रस्तावात त्रृट्या असल्याचे कारण दाखवून प्रकरण परत आले. त्रुट्यांची पूर्तता करून ते प्रकरण पुन्हा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले. त्यानंतर साधारणत: दीड महिन्याचा कालावधी झालेला आहे. त्या प्रकरणाचे संदर्भात संबंधित शेतकरी तीन वेळा एसडीओ कार्यालयात गेले परंतु संबंधित कर्मचबारी शेतकऱ्यांशी उद्धटपणे वागून त्यांना परत पाठवितात. शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. मार्चअखेर कर्जमुक्त व्हायचे आहे. त्यासाठी त्यांना जमिनीची विक्री केल्याशिवाय पर्याय नाही. कुटुंबात १० जणांचा समावेश असलेल्या शेतकऱ्यांला यापूर्वी नैसर्गिक प्रकोपाचा फटका बसलेला आहे.
एकीकडे मोठ्या कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी, नापिकीमुळे आर्थिक संकट व कर्जबाजारीपणा यावर मात करण्यासाठी शेतकरी शेतजमीन विकायला निघालेला आहे. परंतु ‘अच्छे दिन आनेवाले है’ असे म्हणून सत्तेत आलेले सरकार व त्यांचा नोकरवर्ग शेतकऱ्यांना जगू देण्याचा मानसिकतेमध्ये नाही अशी शेतकऱ्याची भावना झालेली असल्याने अखेर आत्महत्येची धमकी देण्याची वेळ गंगाधर लकडसवार यांचेवर आली आहे. (तालुका प्रतिनिधी)