बियाणे कंपनीनंतर निसर्गाचाही दगा
By Admin | Updated: October 10, 2016 00:31 IST2016-10-10T00:31:10+5:302016-10-10T00:31:10+5:30
एक विशेष बाब म्हणजे शेतकऱ्यांनी ज्या पहिल्या दिवशी कृषी केंद्रातून शेतात पेरायला बियाणे घेतले.

बियाणे कंपनीनंतर निसर्गाचाही दगा
आर्थिक संकट : अड्याळ व परिसरातील शेतकरी त्रस्त
विशाल रणदिवे अड्याळ
एक विशेष बाब म्हणजे शेतकऱ्यांनी ज्या पहिल्या दिवशी कृषी केंद्रातून शेतात पेरायला बियाणे घेतले. तेव्हा संपूर्ण भंडारा जिल्ह्यात पेरले पण उगवलेच नाही, असे घडले. त्यानंतर कृषी केंद्र चालकांनी दिलेली पावती व रिकाम्या बॅग, बियाणे बोगस निघालेल्या परत घेऊन पुन्हा पेरणी करायला धान्य बियाणे तर दिले. परंतु शेतकऱ्यांचा गेलेला वेळ, झालेला मानसिक त्रास व पेरणीसाठी येणारा खर्च मात्र दिला नाही. तरीसुद्धा बळीराजा थकला वा रुसला नाही. दुबार तिबार पेरणी करून मातीत मोती उगविले आणि मोती जेव्हा मातीमोल जर होत असेल तर काय अवस्था होईल त्या शेतकऱ्याची? असाच काहीसा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
अड्याळ व परिसरातील सर्वपक्षीय नेते मंडळी शेतकऱ्यांच्या हितासाठी पुष्कळ काही करतात आणि करतोही म्हणतात. परंतु गेल्या १२ वर्षापासून कृषी उत्पन्न समितीचा बाजार हा अड्याळ मधून बेपत्ता आहे. तो सुरु व्हावा म्हणून शेतकरी चर्चा करतात. मग शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना यासाठी अपयश का आले असणार? याला जबाबदार कृषी उत्पन्न बाजार समिती की सत्ता बदलीचा परिणाम असावा की दमदार नेतृत्वाचे नेते मंडळी नसल्याचे कारण? अशा अनेक प्रश्नात अड्याळ व परिसरातील शेतकरी या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विषयी बोलताना आढळतो. यावर्षी येथील शेतकऱ्यांना पाऊस वेळेवर पडला नाही. कधी पेरले पण उगवले नाही. त्यामुळे दुबार पेरणी, पेरलेल्या बियाण्यांना वेळेवर पाणी उपलब्ध न झाल्याने तिबार पेरणी केली. शेतात जेवढा पाणी तेवढीच रोवणी. थेंबे थेंबे तळे साचे, या प्रमाणे करून पूर्ण मळा फुलविला. त्यानंतर नेरला उपसा सिंचन सुरु केल्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. काही दिवसाआधी शेतकरी व त्याचे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. परंतु या आठवड्यात आलेल्या बेमोसमी पावसामुळे मात्र मेहनतीवर पाणी फिरण्याचे लक्षण दिसत असल्याने सर्व शेतकऱ्यांचे हाल बेहाल झाल्याचे दिसत आहे.
मागील वर्षीपेक्षा यावर्षी पीक चांगली भरभरून उभी होती. परंतु या निसर्गाच्या लहरीपणामुळे डौलात डोलणारी उभी पिक आज मात्र जमिनदोस्त झाली आहेत. जेवढे दु:ख पेरले पण उगवले नाही त्यावेळपेक्षाही आता उभी पिक पाण्यात गेल्यामुळे होत आहे. शेतकऱ्यांनी गोष्ट ऐकायची कुणाची विश्वास ठेवावा कुणावर? हवामान खात्याचे अंदाज फोल ठरतात, नवनवीन जास्त उत्पादन देण्याचे दावे सांगणारे बियाणे कंपनी ही लुबाडणूक करायला थांबत नाही. निसर्ग ऋतू चक्रावरचा विश्वासही राहिलेला नाही. मग करायचे काय? समजा समस्त शेतकऱ्यांनी शेती कसणे जर बंद केले अशी कल्पना जरी केले तर काय होईल. म्हणण्यापेक्षा काय काय नाही होईल म्हणून अन्न हे पूर्णब्रम्ह आहे आणि त्यामुळे अन्नाला जो मेहनतीने उत्पन्न करतो त्याकडे बाकीपेक्षा आधी लक्ष देणे आहे.