एका नायब तहसिलदारांवर साकोली तालुक्याचा कारभार
By Admin | Updated: July 24, 2016 00:26 IST2016-07-24T00:26:58+5:302016-07-24T00:26:58+5:30
इंग्रजकालीन तहसिल कार्यालय म्हणून साकोली तहसील कार्यालयाची ओळख आहे.

एका नायब तहसिलदारांवर साकोली तालुक्याचा कारभार
नागरिकांची कामे खोळंबली : तहसीलदारांवर नगरपरिषदेचे अतिरिक्त काम
संजय साठवणे साकोली
इंग्रजकालीन तहसिल कार्यालय म्हणून साकोली तहसील कार्यालयाची ओळख आहे. मात्र सध्या या कार्यालयाला ग्रहण लागले असून अधिकाऱ्याअभावी नागरिकांची कामे खोळंबली आहेत. या कार्यालयासाठी नायब तहसिलदार ही चार पदे मंजुर असताना केवळ एक तहसिलदार आहे.
साकोली तालुक्यात ९६ गावे आहेत. या ९ गावांचा कारभार या तहसिल कार्यालयातून चालतो. शासनाने तहसिल कार्यालयासाठी चार नायब तहसिलदारांची पदे मंजुर केली आहेत. यात निवडणुक विभाग, तपासणी पथक व दोन सामान्य विभाग अशी चार वेगवेगळी विभाग आहेत. सदर तहसिल कार्यालय हे उपविभागाला लागुन असल्यामुळे इथे कामाचा ताण आहे. मात्र शासनाने चार नायब तहसिलदारऐवजी एकच नायब तहसीलदार देऊन साकोली तालुकावासीयांवर अन्याय केला आहे. या तहसील कार्यालयात दररोज हजारो लोक विविध कामासाठी येतात. आल्यानंतर विविध दाखले, प्रमाणपत्र, सेतु करतात. मात्र कधी तहसीलदार हजर नसतात त्यामुळे सह्यासाठी नागरिकांना तासनतास प्रतिक्षा करावी लागते. तर कधी कधी अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे परत जावे लागते. एका दाखल्यासाठी नागरिकांना दोन ते तीन दिवस चकरा माराव्या लागतात.
परिणामी लोकांचा पैसा व वेळही वाया जातो. याकडे अधिकारी व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष आहे. सध्यास्थितीत या कार्यालयात एकच नायब तहसिलदार कार्यरत आहे. साकोली तहसिलदाराकडे या तहसिल कार्यालयाव्यतिरिक्त साकोली नगरपरिषद प्रशासकपदाचा अतिरिक्त कारभार आहे. ही नगरपरिषद नव्याने घोषित झाल्यामुळे कामाचा ताण आहे. त्यामुळे तहसिलदारांना तहसिल कार्यालयापेक्षा अधिक वेळ नगरपरिषदेकडे द्यावा लागते. त्यामुळे ना धड तहसिलचे कामे होत ना धड नगरपरिषदेचीही कामे होतात. त्यामुळे लोकांची कामे रखडलेली आहेत.
मागील महिन्यापर्यंत या कार्यालयीन दोन नायब तहसिलदार कार्यरत होते पैकी नायब तहसिलदार दिनकर खोत यांना जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे एक महिन्यासाठी पाठविण्यात आले. त्यामुळे आता या कार्यालयात एकच नायब तहसिलदार आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना या तहसिल कार्यालयाची अवस्था माहिती असुन देखील नायब तहसिलदार खोत यांना भंडारा येथे का पाठविण्यात आले. या तहसिल कार्यालयात नायब तहसिलदार या पदाबरोबरच लिपीकाचे चार ते पाच पदेही रिक्त आहेत. त्यामुळे लिपीकावर अतिरिक्त कामाचा ताण आहे. अधिकाऱ्यांनी साकोली तहसिल कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची रिक्त पदे तात्काळ भरावी अशी मागणी नागरिकांची आहे.