पांदण रस्त्याअभावी शेतकऱ्यांची होणारी कसरत प्रशासनाला दिसेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:39 IST2021-08-24T04:39:46+5:302021-08-24T04:39:46+5:30
भंडारा : तालुक्यातील खमारी बुट्टी येथे वाडीपार हद्दीतील ५० शेतकऱ्यांचा नाल्याने जाणारा रस्ता बंधाऱ्यामुळे बंद झाल्याने त्यांच्या पुढे वहिवाटीचा ...

पांदण रस्त्याअभावी शेतकऱ्यांची होणारी कसरत प्रशासनाला दिसेना
भंडारा : तालुक्यातील खमारी बुट्टी येथे वाडीपार हद्दीतील ५० शेतकऱ्यांचा नाल्याने जाणारा रस्ता बंधाऱ्यामुळे बंद झाल्याने त्यांच्या पुढे वहिवाटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी शासनाने नवीन पांदण रस्ता तयार करून द्यावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली असून, याबाबचे निवेदन भंडारा तहसीलदारांना देण्यात आले आहे.
खमारी बुट्टी येथील शेतकऱ्यांची मांडवी साझाअंतर्गत येणाऱ्या वाडीपार क्षेत्रात शेतजमीन आहे. यातील जवळपास १०० एकर क्षेत्रातील शेतकरी पाटाच्या रस्त्याने वहिवाट करीत होते. मात्र, मागील वर्षी या नाल्यावर बंधारा बनल्याने निचरा होणाऱ्या पाण्याने दलदल निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचा शेतावर जाणारा रस्ता बंद झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांना शेतात भात रोवणी, खते, बियाणे नेण्याकरिता, तसेच ट्रॅक्टर, बैलबंडी नेणे अतिशय कसरतीचे ठरत आहे.
धान पिकाच्या मळणीनंतर शेतातून रस्त्याअभावी शेतमाल घरी आणायचा कसा? असा प्रश्न आताच निर्माण झाला आहे. काही शेतकरी आपल्या हितसंबंधामुळे बळीराजाची होणारी कसरत पाहून आपल्या शेतातून शेतकऱ्यांना तात्पुरते जाऊ देत आहेत. मात्र, यापुढे जाऊ न दिल्यास शेतकऱ्यांवर भविष्यात आपली शेती पडीक ठेवण्याची वेळ येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे शेकडो एकर शेतजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांची समस्या तातडीने निकाली काढून येथे नवीन पांदण रस्ता तयार करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन देताना खमारी येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर ठवकर, मोसम पवनकर, कोदा मारवाडे, नरेंद्र मारवाडे, ईश्वर खोब्रागडे, दिलीप मारवाडे, श्यामू ठवकर, ताराचंद मोहरकर, वामन आग्रे, रमेश मते, राजकुमार ठवकर, भगवान मारवाडे, दिनेश पवनकर, हिरामण पवनकर, सुरेश पवनकर, वासुदेव मारवाडे, सुखदेव मारवाडे, फुलचंद आग्रे, अण्णा ठवकर आदी शेतकरी उपस्थित होते.
बॉक्स
प्रशासन शेतकऱ्यांना न्याय देणार का
भंडारा तालुक्यातील खमारी बुट्टी येथे वाडीपार हद्दीतील अनेक शेतकऱ्यांचा रस्ता बंधाऱ्यामुळे बंद झाल्याने ऐन खरीप हंगामात चिखलातून जीव धोक्यात घालून आपल्या बैलांची होणारी दमछाक शेतकऱ्यांना पाहावत नाही. सरकारी काम आणि सहा महिने थांब या म्हणीप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांना सरकारी कामाचा अनुभव येतो. मात्र, प्रशासनाने शेतकऱ्यांना तत्काळ न्याय देण्याकरिता हा पांदण रस्ता खडीकरण अथवा डांबरीकरण करण्याची गरज आहे. रस्त्याअभावी परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कोट
खमारी बुट्टी येथे वाडीपार हद्दीतील ५० शेतकऱ्यांचा नाल्याने जाणारा रस्ता बंधाऱ्यामुळे बंद झाला आहे. ऐन खरिपात शेतकऱ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिसरात वन्य प्राण्यांचाही धोका आहे. पांदण रस्त्यासाठी भंडारा तहसीलदारांनी तत्काळ मार्ग काढून शेतकऱ्यांना न्याय देण्याची गरज आहे.
किशोर ठवकर,
सामाजिक कार्यकर्ते, खमारी बुट्टी