यापुढे फुकट जाहिरातबाजांवर होणार कारवाई
By Admin | Updated: February 11, 2015 00:35 IST2015-02-11T00:35:04+5:302015-02-11T00:35:04+5:30
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर अनधिकृतपणे स्टिकर, पोस्टरर्स व बसस्थानक परिसरात होर्डिंग्स लावून जाहिरात करणाऱ्यांविरुद्ध...

यापुढे फुकट जाहिरातबाजांवर होणार कारवाई
लोकमत विशेष
देवानंद नंदेश्वर भंडारा
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर अनधिकृतपणे स्टिकर, पोस्टरर्स व बसस्थानक परिसरात होर्डिंग्स लावून जाहिरात करणाऱ्यांविरुद्ध आता पोलीस कारवाई करण्यात येणार आहे.
एसटी महामंडळाच्या बसेस व स्थानकावर संधीसाधूनी व्यवसायाच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी स्टिकर व पोस्टर लावतात. त्यासाठी रीतसर परवानगी घेतली जात नाही. त्यामुळे बसेस व स्थानकाचे विद्रुपीकरण होत असून महसूलसुद्धा बुडतो. अशा जाहिरातबाजांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. याबाबत बसस्थानक परिसरात होर्डिंग्स लावू नये, अशा सूचना भंडारा बस स्थानकावर उद्घोषणेद्वारे केले जात आहेत. मात्र फुकटच्या जाहिरातबाजांवर आवर घालणे कठिण होत आहे. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा २००५ नुसार रूग्णालये, रेल्वे स्थानक, बस स्थानक आदी सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे जाहिराती लावू नये किंवा जाहिराती लावायच्याच असतील तर संबंधित करारबद्ध कंपन्यांकडून रितसर परवानगी घेऊन लावावे, असे नियम आहेत.
मात्र बसस्थानक परिसरात संधी साधून होर्डिंग्स लावण्यात येत असल्याचे प्रकार आढळले आहेत. दुसऱ्या दिवशी एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून सदर जाहिरातीवरील मोबाईल क्रमांक व इतर माहिती संकलित केली जात आहे. अशा जाहिरातबाजांना एकदा समज दिली जात असून पुन्हा तसाच प्रकार आढळला तर पोलिसांत तक्रार केली जाणार आहे. भंडारा आगाराच्या बसेस अकोला व अमरावती अशा दूर ठिकाणाहून परतल्या की बसच्या आत किंवा बाहेर जाहिरातीचे स्टिकर किंवा पोस्टर लावलेले आढळते.
अंनिस करणार पोलिसांत तक्रार
एसटी बसमध्ये लावलेल्या जाहिरातींमध्ये वशीकरण, शिल्पकार, मूर्तिकार व भोंदूबाबांच्या जाहिरातींचे अधिक प्रमाण असते. त्यामुळे अशा जाहिरातींची माहिती जमा करून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहमतीने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात येईल. अशा जाहिरातबाजांनी फुकटच्या जाहिराती करण्यापासून किंवा एसटीचे विद्रुपीकरण करण्यापासून स्वत:ला आवरले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अंनिसचे विष्णू लोणारे यांनी दिली.
जाहिरातींसाठी दोन कंपन्यांसह करारनामा
एसटी बसवर किंवा बसच्या आत जाहिरात लावण्यासाठी पृथ्वी असोसिएट्स मुंबई या कंपनीसह करार करण्यात आला आहे. बसस्थानक परिसरात होर्डिंग्सद्वारे जाहिरात करण्यासाठी काही कंपनीसह करार करण्यात आला असून या कंपनीचे कापोर्रेट कार्यालय मुंबई येथे आहे. ज्यांना बसद्वारे किंवा बस स्थानक परिसरात जाहिरात करायची असेल त्यांना रीतसर सदर कंपन्यासह बोलून संबंधित प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्याचे शुल्क भरल्यावरच अधिकृतपणे जाहिरात केली जावू शकते. त्याद्वारे लिलावातून कोटी रूपयांचा महसूल गोळा होतो.