धान खरेदी करण्यास टाळाटाळ केल्यास कारवाई
By Admin | Updated: December 2, 2014 23:01 IST2014-12-02T23:01:56+5:302014-12-02T23:01:56+5:30
जिल्हयातील शासकिय आधारभूत धान खरेदी केंद्र तसेच धान खरेदी करणाऱ्या संस्थानी धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यास टाळाटाळ केल्यास संबंधित यंत्रणेस जबाबदार धरु कारवाई करण्यात येईल.

धान खरेदी करण्यास टाळाटाळ केल्यास कारवाई
साकोली : जिल्हयातील शासकिय आधारभूत धान खरेदी केंद्र तसेच धान खरेदी करणाऱ्या संस्थानी धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यास टाळाटाळ केल्यास संबंधित यंत्रणेस जबाबदार धरु कारवाई करण्यात येईल. धान खरेदी प्रकरणी शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी सोडविण्यासाठी संपर्क साधावा असे आवाहन आमदार चरण वाघमारे यांनी केले.
जिल्हयातील शासकिय आधारभुत धान खरेदी केंद्र तसेच धान खरेदी करणाऱ्या संस्था खरेदी केलेले धान्य साठवून ठेवण्यासाठी गोडाऊनची व्यवस्था नसल्यामुळे धान खरेदी करता येत नाही अशी तांत्रिक अडचण निर्माण करुन धान खरेदी करण्यास टाळाटाळ करित असल्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना वेठीस धरुन जिल्हयातील शेतकऱ्यांचे शारीरिक, मानसिक व आर्थिक शोषण होत असल्याची बाबा वाघमारे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी १ डिसेंबर रोजी कार्यकारी संचालक महाराष्ट्र फेडरेशन मुंबई यांचेशी संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणून दिली. व कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण न करता धान खरेदी करण्याचा आग्रह धरला. कार्यकारी संचालक महाराष्ट्र फेडरेशन मुंबई यांनी ही बाब मान्य करुन याबाबतच्या सुचना जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
महाराष्ट्र पनन फेडरेशन संहितेतील अधिनियम अटी व शर्तीतील तरतूदीनुसार शासकिय आधारभूत धान खरेदी केंद्र व संस्थानी धान खरेदी केंद्राच्या ठिकाणी धान साठवणूक करण्यासाठी गोडाऊनची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. पंरतु संबंधित यंत्रणा गोडाऊनची पर्याप्त प्रमाणात व्यवस्था करण्याकडे दुर्लक्ष करुन जबाबदारी झटकत असल्यामुळे धान्य साठवणुकीची समस्या निर्माण झाली यास जिल्हा फेडरेशन मार्केटिंग विभागाचे उपेक्षीत धोरण कारणीभूत आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
त्यामुळे भारतीय जनता पक्ष प्रणित महाराष्ट्र शासनाने शासकिय आधारभूत हमी भावानुसार शेतकऱ्याचे धान खरेदी करण्याची जबाबदारी स्वीकारली असुन धान खरेदी केंद्रावर साठवणूकीसाठी जागा किंवा व्यवस्था नसेल तरी शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात येईल अशी हमी दिली असल्याने शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर विक्री साठी आणलेले धान तांत्रिक अडचणी निर्माण करुन वापस पाठवू नये. धान खरेदी करणाऱ्या संबंधित यंत्रणेने टाळाटाळ केल्यास यंत्रणेस जबाबदार धरुन कारवाई करण्यात येईल. कोणत्याही प्रकारची गैर करणार नाही. धान खरेदी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित यंत्रणेस जबाबदार धरुन फेडरेशन अॅक्टनुसार रितसर कारवाई करण्यात येईल अशा इशारा वाघमारे यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)