देवसऱ्यात गावठी दारू विक्रेत्यांविरोधात कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:34 IST2021-04-25T04:34:50+5:302021-04-25T04:34:50+5:30
: सिहोरा परिसरात गावठी दारूची विक्री धडाक्यात सुरू झाली असल्याने ठाणेदार नारायण तुरकुंडे यांनी बेधडक कार्यवाहीचा बडगा उगारला आहे. ...

देवसऱ्यात गावठी दारू विक्रेत्यांविरोधात कारवाई
: सिहोरा परिसरात गावठी दारूची विक्री धडाक्यात सुरू झाली असल्याने ठाणेदार नारायण तुरकुंडे यांनी बेधडक कार्यवाहीचा बडगा उगारला आहे. देवसऱ्यात तीन जणांवर कारवाई करण्यात आली असून १ लाख १६ हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. यामुळे दारू विक्रेत्यांत भीती संचारली आहे.
बावनथडी नदीच्या काठावर असणाऱ्या देवसरा गावात गावठी दारूचे गाळप करण्यात येत आहे. नदीचे पात्र आटल्याने मोहफुल दारू गाळपचे अड्डे तयार करण्यात आले आहेत. सडवा मोहफुल नदीपात्रात ठेवण्यात येत आहे. या गावातील गावठी दारूविक्री प्रसिद्ध असल्याने नजीकच्या मध्य प्रदेशातील नागरिक मोठ्या प्रमाणावर दारू ढोसण्यासाठी येत आहेत. या गावास सायंकाळी यात्रेचे रूप येत आहे. गावकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. या गावात मोहफुल दारू विक्रेत्यांविरोधात या पूर्वी ठाणेदार नारायण तुरकुंडे यांनी धाडसी कारवाई केली आहे.
अनधिकृत दारू विक्रेत्यांची गय केली जाणार नाही, हे आधीच ठाणेदार यांनी सांगितल्यानंतरही दारू विक्रेत्यांची मुजोरी सुरू झाली आहे. बेधडक बपेरा शिवारात मोहफुल दारूची विक्री करण्यात येत आहे. प्लास्टिक पिशवीत दारूचे पार्सल देण्यात येत आहे. त्यांचे एजंट महालगाव, नदीचा काठ आदी ठरावीक जागेत सायंकाळी हजेरी लावत आहेत. दारू खरेदीकरिता झुंबड सुरू होत असल्याने कोरोना संसर्ग विषाणूचा प्रसार होण्याची भीती निर्माण होत आहे. सामाजिक सुरक्षा अंतराचे वारे न्यारे करण्यात येत आहे. सायंकाळी दारू अड्ड्यावर गर्दी होत असल्याने गावकऱ्यांच्या वाढत्या तक्रारी आहेत. गावात भीती संचारत असल्याने रोष आहे.
बॉक्स
अशी झाली कारवाई
मोहफुल दारूविक्री डोके वर काढत असताना ठाणेदार नारायण तुरकुंडे यांनी अंकुश घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. देवसरा गावात अजय कोचे (४०), देवेंद्र कोचे (३९) आणि राकेश कोचे (४६) हे मोहफुल दारूची विक्री करणारे माफिया नदीच्या काठावर सडवा मोहफुलाच्या दारूचे गाळप करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता ठाणेदारांनी सापळा रचला. गावाच्या शेजारी असणाऱ्या दारू अड्ड्यावर धाड घातली असता १ लाख १६ हजारांचे मोहफुल आढळून आले आहे. पोलिसांनी मोहफुल नष्ट केले असून दारू विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊन असल्याने परवानाप्राप्त दारूची विक्री बंद आहे. यामुळे गावठी दारूची मागणी वाढली आहे. याच संधीचा फायदा घेत गावठी दारू विक्रेत्यांनी एका पाउच दरात डबल धमाका सुरू केला आहे. दुहेरी दराने विक्री करण्यात येत असले तरी दारूत अनेक रासायनिक पदार्थ मिश्रण केले जात आहेत. यामुळे नागरिकांच्या जीवानिशी खेळ सुरू झाला आहे. दरम्यान, ठाणेदार तुरकुंडे यांनी गावठी दारूची विक्री रोखण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करीत अंकुश घालण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.