समर्पित भावनेतूनच यशाची प्राप्ती

By Admin | Updated: February 11, 2016 00:51 IST2016-02-11T00:51:15+5:302016-02-11T00:51:15+5:30

विद्यार्थी स्वत:ला ग्राहक समजतात तर त्यांच्यावर संस्कार करणारे प्राध्यापक उपजिविकेचे साधन म्हणून कर्तव्य पार पाडतात.

Achievement through dedication | समर्पित भावनेतूनच यशाची प्राप्ती

समर्पित भावनेतूनच यशाची प्राप्ती

कुलगुरु काणे यांचे प्रतिपादन : एस.एन. मोर महाविद्यालयाचा सुवर्ण जयंती समारोह
तुमसर : विद्यार्थी स्वत:ला ग्राहक समजतात तर त्यांच्यावर संस्कार करणारे प्राध्यापक उपजिविकेचे साधन म्हणून कर्तव्य पार पाडतात. या मानसिकतेतून दोघांनाही बाहेर पडण्याची गरज आहे. आपल्या कामाशी इमान राखून संस्थेप्रती समर्पित भावना ठेवली तर विद्यार्थी व संस्थेला यश प्राप्त होईल, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सिद्धार्थ काणे यांनी केले.
तुमसर येथील सेठ नरसिंगदास मोर महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी समारोप सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षा पटेल होत्या. अतिथी म्हणून संस्थेचे सचिव आमदार राजेंद्र जैन, नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, माजी आमदार मधुकर कुकडे, माजी नगराध्यक्ष विजयकुमार डेकाटे, पालिका उपाध्यक्ष सरोज भुरे, नगरसेवक राजेश देशमुख, देवेंद्रनाथ चौबे, प्राचार्य डॉ.चेतनकुमार मसराम उपस्थित होते.
यावेळी कुलगुरु डॉ.काणे म्हणाले, जीवनात तीन गोष्टीला अत्यंत महत्व आहे. यात जिव्हाळा व आपुलकीचे संबंध, कामाप्रति प्रामाणिकता आणि संस्थेप्रती समर्पित भावना ठेवणे. प्रत्येकाने आपले वेगळेपण जपले पाहिजे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी तर शिक्षकांनी शिक्षक समजले पाहिजे. पूर्वी संसाधने नव्हती. आज संसाधने आहेत. वाहतूक नव्हती, परंतु नाते होते. आज नाते बदलत चालले आहे. नात्यांना आवर घालणे आवश्यक आहे. विद्यार्थी व प्राध्यापकांचे नाते मित्रत्वाचे व मार्गदर्शकाचे असलेच पाहिजे. तेव्हाच संस्थेला यश प्राप्त होते. मी सांगितलेला मंत्र उपयोगात आणा. सहा महिन्यात तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी संस्थेचे सचिव आमदार राजेंद्र जैन म्हणाले, विद्यार्थ्यांनी यशाची शिखरे गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. जिद्द, नियमित अभ्यास, कठोर मेहनतीशिवाय यश मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.चेतनकुमार मसराम यांनी केले. संचालन प्रा.रेणुकादास उबाळे, डॉ.आर.के. दिपटे, दहलीवाल यांनी केले. याप्रसंगी संस्थेतर्फे महाविद्यालयाचा आढावा घेणाऱ्या स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा.सुभाष पवार यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या सभापती शुभांगी रहांगडाले, डॉ.राहुल भगत, डॉ.गोल्डी बघमार, डॉ. कोलमचंद साठवणे, डॉ.संजय आगाशे, प्रा.रेणुकादास उबाळे, प्रा.कविता लेंडे, प्रा.भारती काटेखाये, प्रा.के.आर. रामटेके, प्रा.टेंभुर्णे, प्रा.मंडपे, डॉ.एम.पी. लांबट, प्रा.सुनिल कान्होलकर, प्रा.लक्ष्मण पेटकुले, प्रा.राजेंद्र बेलोकार, प्रा.सचिन देऊळकर, प्रा.डॉ.आर.के. दिपटे, नंदू रामटेकेसह पूरण मेश्राम, राकाँ शहराध्यक्ष योगेश सिंगनजुडे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कल्याणी भुरे, कविता साखरवाडे, यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

शनी मंदिरात प्रवेश मिळावा - वर्षा पटेल
महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. शिक्षणाशिवाय तरणोपाय नसल्याचे सांगून शनी शिंगणापूर मंदिरात महिलांना प्रवेश मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांनी केले. यावेळी त्या म्हणाल्या, मनोहरभाई पटेल यांनी भंडारा गोंदिया जिल्ह्यात शिक्षणाची गंगा आणली. लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन गेले त्यांनी महाविद्यालयाला भेट द्यावी. आज मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. शिक्षणामुळेच मनुष्य मोठा होता. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यात केवळ विद्यार्थिनींची संख्या जास्त आहे. मुलांनीसुद्धा अभ्यासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. शिक्षणासोबत सामाजिक क्षेत्रातही पुढे येण्याचे आवाहनही वर्षा पटेल यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. यावेळी वर्षा पटेल यांनी कुलगुरु डॉ.काणे यांना गोंदिया शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात जागतिक दर्जाच्या सुविधा पाहायला येण्याचे आमंत्रण दिले.

Web Title: Achievement through dedication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.