आरोपीला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा
By Admin | Updated: November 30, 2014 22:59 IST2014-11-30T22:59:46+5:302014-11-30T22:59:46+5:30
तुमसर तालुक्यातील आलेसूर येथे रुपचंद नेवारे (४०) रा. चिचोली यांचा खून करणाऱ्या आरोपी भिकराम घोनाडे (३५) रा. चिखला याला ७ वर्षाचा सशक्त कारावास व ४ हजार रुपये दंडाची शिक्षा तदर्थ जिल्हा

आरोपीला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा
आलेसूर येथील खून प्रकरण : जिल्हा व सत्र न्यायालयाचा आदेश
भंडारा : तुमसर तालुक्यातील आलेसूर येथे रुपचंद नेवारे (४०) रा. चिचोली यांचा खून करणाऱ्या आरोपी भिकराम घोनाडे (३५) रा. चिखला याला ७ वर्षाचा सशक्त कारावास व ४ हजार रुपये दंडाची शिक्षा तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. बी. येनुरकर यांनी दि. २८ नोव्हेंबर रोजी सुनावली.
याबाबत असे की, रुपचंद परसराम नेवारे हा पत्नीसह त्यांचे सासरे गंगाराम शेंदरे रा. आलेसूर येथे बैलांचा शंकरपट व जलसा कार्यक्रम असल्याने पाहूणा म्हणून आला होता. गंगाराम शेंदरे यांची लहान मुलगी हिरणबाई आरोपी भिकराम नानू घोनाडे यांची पत्नी आहे. अजय व पोर्णिमा या मुलांसह पत्नीला भिकराम उर्फ डेमू यांनी सासरे गंगाराम शेंदरे यांच्याकडे ठेवले होते. भिकराम कधीकधी चिखला येथून येणे-जाणे करीत होता. घटनेच्या दिवशी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास तो आलेसूर येथे आला होता. अंगणातील पडवीच्या एका बाकावर बसून मुलगा अजयला खेळवित होता. दरम्यान अजय त्याच्या हातातून निसटून पळायला लागला व खाली पडला. त्यामुळे पत्नी हिरणबाई यानी ‘मुलायला पोसायला खर्च करीत नाही. बायकोला एकही रुपया देत नाही’ असे हटकले. तेव्हा आरोपी भिकराम याने पत्नी हिरणबाईला मारहाण केली. गंगाराम शेंदरे यांनी मध्यस्थी केली असता त्यांनाही मारहाण केली. त्यानंतर भिकराम बाहेर निघून गेला. थोड्यावेळातच गावात ठेवलेल्या एका बैलबंडीची सागवान झाडापासून बनविलेली उभारी घेवून तो परत आला. शिविगाळ करु लागला. त्यावेळी रुपचंद नेवारे यांनी हटकले असता भिकराम याने रुपचंदच्या डोक्यावर, पाठीवर व मानेवर काठीने प्रहार केला. यात रुपचंद गंभीररित्या जखमी झाले. यावेळी उपस्थित गंगाराम शेंदरे, हिरणबाई, रुपचंदची पत्नी अंजनाबाई व शेजाऱ्यांनी रुपचंद यांचे डोके दाबून धरले. गंगाराम शेंदरे यांनी मोहन शेंदरे याला पोलिस पाटीलाला बोलाविण्यास सांगितले. पोलिस पाटील हे कोतवालासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बैलबंडीत जखमी रुपचंद याला टाकून लेंडेझरी येथील दवाखान्यात नेण्यास निघाले. परंतु रुपचंदचा वाटेतच मृत्यू झाला. याप्रकरणाची तक्रार पोलिस पाटील कुंडलीक मेहर यांनी तुमसर पोलिसात केली.
तक्रारीवरुन पोलिसांनी भिकराम घोनाडे याच्या विरुध्द भादंवि ३०२ कलमान्वये गुन्हयाची नोंद केली.
पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून गेला. घटनेचा तपास तुमसर पोलिसांनी केल्यानंतर सदर प्रकरण भंडारा येथील तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. बी. येनुरकर यांच्या न्यायालयात दोषारोपण पत्र दि. २ नोव्हें. १९९९ ला दाखल करण्यात आला.
आरोपी भिकराम पळून गेल्याने व पोलिसांना न गवसल्याने प्रकरण स्थगित होते. तुमसर पोलिसांनी दि. ६ डिसेंबर २०१३ रोजी आरोपी भिकराम याला अटक केली. आरोपी जवळपास १५ वर्षानंतर सापडलेला होता. त्याला न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले. साक्षपुराव्याच्या तपासा अंती न्यायाधीश येनुरकर यांनी आरोपी भिकराम उर्फ डेमू घोनाडे याला भांदवि ३०४ कलमान्वये दोषी करार करण्यात आले. व ७ वर्षाची शक्त मजुरी कारावास तसेच ४ हजार रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली. पुन्हा जर ४ हजाराचा दंड न भरल्यास ४ महिन्यांची शिक्षा होईल अशाही आदेश पारित केला. सरकारी पक्षातर्फे अॅड. राजकुमार वाडीभस्मे यांनी युक्तीवाद केला. (नगर प्रतिनिधी)