पावसाच्या प्रतीक्षेत आटाेपली जिल्ह्यात 94 टक्के राेवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 05:00 IST2021-08-13T05:00:00+5:302021-08-13T05:00:43+5:30
भंडारा जिल्ह्यात कृषी विभागाच्या नियाेजनानुसार यावर्षी १ लाख ६१ हजार ४९३ हेक्टरवर राेवणी हाेणार हाेती. सुरुवातीला दमदार पाऊस काेसळला. मात्र गत महिन्याभरापासून पावसाचा जाेर कमी झाला. तुरळक सरी साेडता जिल्ह्यात कुठेही दमदार पाऊस झाला नाही. दुसरीकडे नर्सरीतील पऱ्हे माेठे हाेऊ लागले. पाऊस नाही, राेवणी कशी करायची या चिंतेत शेतकऱ्यांनी उसणवार करीत शेतात सिंचनाची सुविधा केली आणि एकदाची राेवणी आटाेपली.

पावसाच्या प्रतीक्षेत आटाेपली जिल्ह्यात 94 टक्के राेवणी
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सुरुवातीला दमदार काेसळलेल्या पावसाने दडी मारली ती आजतागायत. आज बरसेल, उद्या बरसेल या आशेवर पावसाच्या प्रतीक्षेत जिल्ह्यात ९४ टक्के राेवणी आटाेपली. १ लाख ६१ हजार ४९३ हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ५२ हजार ६७ हेक्टरवर राेवणी आटाेपली असून आता धानपिकाला पाणी देण्यासाठी शेतशिवारात इंजीनचा आवाज घुमू लागला. सुरुवातीच्या पावसाने कागदाेपत्री पावसाची सरासरी कायम असली तरी वाढत्या तापमानाने धानपीक धाेक्यात येण्याची भीतीही कायम आहे.
भंडारा जिल्ह्यात कृषी विभागाच्या नियाेजनानुसार यावर्षी १ लाख ६१ हजार ४९३ हेक्टरवर राेवणी हाेणार हाेती. सुरुवातीला दमदार पाऊस काेसळला. मात्र गत महिन्याभरापासून पावसाचा जाेर कमी झाला. तुरळक सरी साेडता जिल्ह्यात कुठेही दमदार पाऊस झाला नाही. दुसरीकडे नर्सरीतील पऱ्हे माेठे हाेऊ लागले. पाऊस नाही, राेवणी कशी करायची या चिंतेत शेतकऱ्यांनी उसणवार करीत शेतात सिंचनाची सुविधा केली आणि एकदाची राेवणी आटाेपली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ५२ हजार ६७ म्हणजे ९४.१६ टक्के राेवणी आटाेपली आहे. त्यात सर्वाधिक राेवणी पवनी तालुक्यात १३७ टक्के म्हणजे २५ हजार २५३ हेक्टरवर करण्यात आली आहे. तर सर्वात कमी राेवणी माेहाडी तालुक्यात ७०.२ टक्के म्हणजे १९ हजार २२ हेक्टरवर करण्यात आली आहे.
धान पिकाला माेठ्या प्रमाणात पावसाची गरज असते. परंतु यावर्षी पाऊस कुठे काेसळताे आणि कुठे काेसळत नाही अशी अवस्था झाली आहे. संपूर्ण राज्यात जाेरदार पाऊस झाला असला तरी गत तीन आठवड्यात भंडारा जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याचे दिसत आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६६२.२ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. १ जून ते १२ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७९८.७ मिमी पाऊस काेसळताे. सध्या जिल्ह्यात ८३ टक्के पाऊस काेसळला आहे. एकीकडे राेवणी झाली परंतु पाऊस बरसत नाही. त्यामुळे अनेक काेरडवाहू शेतकऱ्यांनी इंजीन लावून आता सिंचन सुरू केले आहे.
तूर १,२६७ हेक्टर तर साेयाबीन ७६० हेक्टरवर
- जिल्ह्यात धान पिकासाेबतच तूर आणि साेयाबीनचे पीकही माेठ्या प्रमाणात घेतले जाते. धानाच्या बांधावर तुरीची लागवड केली जाते. कृषी विभागाच्या नियाेजनानुसार १९४६ तूर क्षेत्र असून आतापर्यंत १,२६७ म्हणजे ६५.१३ टक्के लागवड झाली आहे. तर साेयाबीनच्या ६,५९१ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ७६० हेक्टरवर म्हणजे ११.५३ टक्के लागवड करण्यात आली आहे.