गोसे धरण क्षेत्रात पर्यटनासह 900 कोटींच्या कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2022 11:21 PM2022-10-14T23:21:35+5:302022-10-14T23:22:49+5:30

गोसे धरण व बॅक वाॅटर क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ व जलपर्यटनाला बैठकीत मान्यता देण्यात आली. एमपीडीसीच्या श्रद्धा जोशी यांनी जलपर्यटन प्रकल्पाविषयीचा आराखडा सादर केला. या जलपर्यटनातून दहा हजार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

900 crore works approved in Gose Dam area including tourism | गोसे धरण क्षेत्रात पर्यटनासह 900 कोटींच्या कामांना मंजुरी

गोसे धरण क्षेत्रात पर्यटनासह 900 कोटींच्या कामांना मंजुरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गोसे धरण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनासह जोखीम क्षेत्रातील २६ गावांचे पुनर्वसन आणि भंडारा रोड ते भंडारा शहरापर्यंत मेट्रोला मंजुरी अशा सुमारे ९०० कोटी रुपयांच्या विकास कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मंजुरी दिली. यामुळे भंडारा शहरासह जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार असून विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. यासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.
मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या बैठकीला आमदार नरेंद्र भोंडेकर, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, पर्यटन विभागाचे सचिव साैरभ विजय, जिल्हाधिकारी संदीप कदम, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यांच्यासह विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, लाभक्षेत्र विकास मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
गोसे धरण व बॅक वाॅटर क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ व जलपर्यटनाला बैठकीत मान्यता देण्यात आली. एमपीडीसीच्या श्रद्धा जोशी यांनी जलपर्यटन प्रकल्पाविषयीचा आराखडा सादर केला. या जलपर्यटनातून दहा हजार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. गोसे धरणाच्या सभोवतालच्या परिसराचे साैदर्यीकरण, उजव्या व डाव्या कालव्याचे साैदर्यीकरण, वैनगंगा नदीतीरावर साैदर्यीकरण, भंडारा ते आंभोरा व गोसे धरणापर्यंत जलपर्यटन, रिसाॅट, क्रुज हाऊसबोर्ड, सी बोट, मरीना आणि रॅम्प, बम्परराईड, फ्लाईंग फीश, जेटाव्हेटर, पॅरासिलिंग आदी सुविधांसाठी  ३१५ कोटी खर्च अपेक्षित आहे. सुमारे १०१ कोटी ३३ लाख रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे.  प्रकल्प सुरू झाल्यानंतर दोन वर्षात पर्यटकांची संख्या सात लाखांपर्यंत जाईल, अशी अपेक्षा आहे. स्थानिक पातळीवर हाॅटेल, उपहारगृह आणि इतर पर्यटन निगडित उद्योगात गुंतवणूक वाढणार आहे.
गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या जोखीम क्षेत्रातील २६ गावांच्या पुनर्वसनाबाबत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत दिले. सुमारे ४५० कोटींच्या कामांना संमती देऊन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव तयार करण्याचे व शासनाला पाठविण्याचे निर्देश दिले. गोसेखुर्द प्रकल्पामुळे भंडारा जिल्ह्यातील ३४ गावे पूर्णतः व ७० गावे अंशतः बाधित होतात. परंतु त्याव्यतिरिक्त वैनगंगा नदीकाठावरील उंचावर वसलेल्या २६ गावठाणांना गोसेच्या वाढत्या पाणीपातळीमुळे जोखीम पत्करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले. अशा २६ गावांच्या पुनर्वसनाची मागणी  होत होती. आता त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पाठपुराव्याला यश 

- भंडारा विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्याच्या विविध विकास योजनांसाठी आमदार नरेंद्र भोंडेकर सातत्याने दोन वर्षांपासून पाठपुरावा करत होते. त्यांच्या या प्रयत्नांमुळे गोसे धरणबाधितांचे पुनर्वसन, ब्राॅडगेज मेट्रो, गोसे धरण क्षेत्रात पर्यटनाला आता संमती मिळाली आहे. यामुळे भंडारा शहर व जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार आहे. तीनही कामांना लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मंजुरी दिल्यानंतर लवकरच कामाला सुरूवात होईल, अशी माहिती आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी  दिली. जिल्ह्याला दिवाळीची अनोखी भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

भंडारा रोड ते भंडारा शहर मेट्रोला मान्यता
- भंडारा रोड अर्थात वरठी ते भंडारा शहरपर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वत: मान्यता दिली. महारेलमार्फत रेल्वे आणि राज्य सरकार ५०-५० टक्के आर्थिक सहभागासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याची सूचनाही देण्यात आली. यावेळी महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जैस्वाल उपस्थित होते. ११ किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गावर नवीन ब्राॅडगेज मेट्रो लाईन प्रकल्पाचा व्यवहारतेचा अभ्यास अहवाल सादर केला आहे. हा प्रकल्प नागपूर ते भंडारा रोड या भारतीय रेल्वे मार्गावर राबविण्यात येणार आहे. ११ केव्ही लाईन, विद्यानगरजवळ मेट्रो स्टेशन अशा कामांसाठी सुमारे २६५ कोटींच्या खर्चाला तत्वत: मंजुरी दिली.

 

Web Title: 900 crore works approved in Gose Dam area including tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.