७० हजार धानाची पोती उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:34 IST2021-04-25T04:34:57+5:302021-04-25T04:34:57+5:30
मुरमाडी / तुपकर येथील घटना : धानाची उचल नाही लाखनी : तालुक्यातील मुरमाडी / तुपकर येथील भगीरथ ...

७० हजार धानाची पोती उघड्यावर
मुरमाडी / तुपकर येथील घटना : धानाची उचल नाही
लाखनी : तालुक्यातील मुरमाडी / तुपकर येथील भगीरथ सहकारी धान गिरणीमध्ये आधारभूत धान खरेदी केंद्र दिलेले होते. येथे २८ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आले. जिल्हा विपणन अधिकारी यांनी डीओ दिले नसल्यामुळे खरेदी केलेला हजारो क्विंटल धान उघड्यावर पडून आहे. पावसामुळे उघड्यावर असणारी ७० हजार पोती ओली होण्याची भीती आहे.
मागील २७ मार्चपर्यंत खरीप धानाची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. गोदाम उपलब्ध नसल्याने धानाची पोती उघड्यावर ठेवलेली आहेत. खरीप धानाची उचल झालेली नसल्याने उन्हाळी धानाची खरेदी होणार काय, याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बाजारपेठ ठप्प झाली आहे; परंतु कृषी क्षेत्राशी संबंधित कामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना अद्यापही धानाचे चुकारे मिळालेले नाहीत. भरडाई करणाऱ्या गिरणी मालकाचे संप यामुळे धान पोती खरेदी केंद्रात पडून आहेत.
धानाची उचल झालेली नसल्यामुळे धान खरेदी केंद्रांना नुकसान सहन करावे लागते. धानाची तत्काळ उचल झाली तर नुकसान सहन करावे लागणार नाही व उन्हाळी धानाची खरेदी करता येईल. धानाची तत्काळ उचल करण्याची मागणी जिल्हा विपणन अधिकाऱ्यांकडे बी. डी. बोरकर, रामदास कठाणे, मधुकर कोरे, देवराम बारसे, नाना गोंधळे यांनी केली आहे.