६७ मुख्याध्यापक बनले सहायक शिक्षक

By Admin | Updated: August 20, 2014 23:20 IST2014-08-20T23:20:34+5:302014-08-20T23:20:34+5:30

दीडशेपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत ६७ उच्चश्रेणी मुख्याध्यापकांवर गंडांतर आले असून या मुख्याध्यापकांना पदावनत करून सहायक शिक्षक बनविण्यात आले आहेत.

67 Headmaster becomes Assistant Teacher | ६७ मुख्याध्यापक बनले सहायक शिक्षक

६७ मुख्याध्यापक बनले सहायक शिक्षक

आरटीई अ‍ॅक्टचा फटका : समायोजन झाले
प्रशांत देसाई - भंडारा
दीडशेपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत ६७ उच्चश्रेणी मुख्याध्यापकांवर गंडांतर आले असून या मुख्याध्यापकांना पदावनत करून सहायक शिक्षक बनविण्यात आले आहेत.
बोगस विद्यार्थी दाखूवन अनेक खाजगी शाळा महाविद्यालयामध्ये शासनाचे अनुदान लाटल्या जात होते. यासोबतच शाळाबाह्य विद्यार्थ्यांचीही संख्या दाखविण्यात येत असल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झाले होते. खाजगी शाळांचे कारनामे बाहेर यावे व शासकीय अनुदानाची लूट होऊ नये, यासाठी राज्य शासनाने बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (आरटीई अ‍ॅक्ट) कायदा लागू केला. या कायद्यामुळे बोगस विद्यार्थी संख्या व पटपडताळणी यातून पळवाटा काढणाऱ्या शाळांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यात ७६९ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये १४६ मुख्याध्यापकांची पदे असून १४२ पदे भरली आहेत. उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या ६७ मुख्याध्यापकावर आरटीई अ‍ॅक्टनुसार पदावनतीची कारवाई करण्यात आली असून त्या सर्वांना सहायक शिक्षक म्हणून आता जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.
आरटीई अ‍ॅक्टनुसार पहिली ते सातवी आणि पहिली ते आठवी या शाळांमध्ये दीडशेपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांचे पद यामुळे गोठविण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांचे सर्वेक्षण करून अतिरिक्त मुख्याध्यापकांची यादी तयार करून ही कारवाई करण्यात आली आहे. पदावनती होणार असल्याने मुख्याध्यापकांच्या ग्रेड-पे ला कात्री लागणार आहे. मुख्याध्यापकाला सहायक शिक्षकाची जबाबदारी सांभाळावी लागण्याची नामुष्की ओढावणार आहे.
उच्चश्रेणी शाळेचे हे ६७ मुख्याध्यापक एचएससी डी.एड. पात्रताधारक आहेत. मात्र नवीन कायद्यानुसार आता इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत प्राथमिक शिक्षक गणले जाणार आहेत. त्यामुळे या शाळेवर असलेल्या मुख्याध्यापकाची पात्रता पदवीधर असणे गरजेचे आहे. त्यामुळे पदवीधर नसलेल्या उच्चश्रेणी शाळेच्या मुख्याध्यापकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. ६७ पदावनत मुख्याध्यापकांपैकी १० शिक्षक हे पदवीधर असल्याने त्यांना समकक्ष पदावर सामावून घेण्यात आले आहे. मात्र ५७ मुख्याध्यापकावर गंडांतराची कारवाई होणार आहे.
कला शिक्षक नाही
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक अथवा प्राथमिक शाळेतील ७६९ शाळांपैकी एकाही शाळेवर कला शिक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. कला शिक्षकाअभावी येथील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळणे दुरापस्त झाले आहे.

Web Title: 67 Headmaster becomes Assistant Teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.