जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांत ४४ टक्के जलसाठा
By Admin | Updated: July 28, 2014 23:21 IST2014-07-28T23:21:19+5:302014-07-28T23:21:19+5:30
उशिरा का असेना वरूणराजाची कृपादृष्टी भंडारा जिल्ह्यावर बरसली आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांत ४४ टक्के जलसाठा असून यापैकी फक्त एक माजी मालगुजारी तलाव, एक मध्यम

जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांत ४४ टक्के जलसाठा
जलसाठा : मामा तलाव, मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प तुडूंब
भंडारा : उशिरा का असेना वरूणराजाची कृपादृष्टी भंडारा जिल्ह्यावर बरसली आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांत ४४ टक्के जलसाठा असून यापैकी फक्त एक माजी मालगुजारी तलाव, एक मध्यम प्रकल्प तर ३ लघु प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. मध्यम प्रकल्पात पाण्याची सरासरी टक्केवारी ३९.१८ आहे.
जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा साठा दिवसेंगणिक वाढत आहे़ शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पांत सरासरी ४४ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ मागील हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात ३१ टक्क्यांनी घट असल्याचे दिसून येते. मागील वर्षी ही टक्केवारी ७५ इतकी होती.
लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे़ सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी २३़७९, बघेडा १००, बेटेकर बोथली ६४.२९ आणि सोरणा जलाशयात उपयुक्त जलसाठा ५२.५६ टक्के आहे़
जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ४५.४४ टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ४९.५७ टक्के आहे़
जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी.
पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कार्तुली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार या प्रकल्पांचा समावेश आहे. गोसखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले आहे. त्यामुळे वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे़ आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यात संततधार पावसामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ झाल्याने पाणी सोडण्यात आले होते. यामुळे वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांना पूर आला होता. सध्या स्थिती आटोक्यात असून हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. परिणामी नदीकाठावरील गावांना धोक्याची पूर्वसूचना देण्यात आली आहे. गोसेखुर्द धरणाचा जलसाठा वाढला असून वाढत्या प्रवाहामुळे धरणाची सर्व ३३ दारे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे सध्यातरी मुबलक जलसाठा आहे. पूर ओसरल्यानंतरही वैनगंगा नदीचा जलस्तरही वाढलेला आहे. (प्रतिनिधी)