मनरेगातून ४२ लाख मनुष्यनिर्मित दिवस
By Admin | Updated: February 11, 2016 00:48 IST2016-02-11T00:48:25+5:302016-02-11T00:48:25+5:30
मागेल त्याला काम, या उद्देशानुसार राज्य शासनाने ग्रामीण तथा शहरी भागातील मजुरांना काम उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगाची निर्मिती केली आहे.

मनरेगातून ४२ लाख मनुष्यनिर्मित दिवस
२५ हजार मजुरांच्या हाताला काम : दुष्काळाच्या सावटावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन लागले कामाला
भंडारा : मागेल त्याला काम, या उद्देशानुसार राज्य शासनाने ग्रामीण तथा शहरी भागातील मजुरांना काम उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगाची निर्मिती केली आहे. यातून जिल्ह्यात यावर्षी २५ हजार २८५ मजुरांच्या माध्यमातून ४१ लाख ९७ हजार मनुष्यनिर्मित दिवसातून जिल्हा प्रशासनाने मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला. एक मजूर, एक मनुष्यनिर्मिती दिवस अशी परिभाषा मजुरांच्या कामाला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत करण्यात आली आहे. जिल्ह्यात रोहयो व ५० टक्के ग्रामपंचायत स्तर व अन्य एजंसीच्या माध्यमातून जिल्ह्यातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
जिल्ह्यात ५ लाख ६० हजार नोंदणीकृत (जॉब कार्ड धारक) मजुरांची नोंदणी आहे. त्यातील २ लाख ४५ हजार मजुरांची आतापर्यंत कामावर वर्णी लागली आहे. ७७ कोटी ३१ लाख कुशल व अकुशल कामांसाठी निधी प्राप्त झाला असून त्यापैकी ५८ कोटी ८० लाख मजुरीवर खर्च करण्यात आला असून हा खर्च अकुशल कामगारांवर करण्यात आला असून उर्वरीत खर्च कुशल कामगारांवर करण्यात आला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वृक्ष संगोपन, शौचालय बांधकाम, मुरुम सिमेंट रस्ते नालीबांधकाम, मामा तलाव गाळ काढणे व बोडी खोलीकरण, पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून नहर दुरुस्ती, नाला सरळीकरण करणे, बंधाऱ्यातील गाळ काढणे, सिंचन विहिर, मत्स्य संवर्धन तळी, बांधकाम व शेततळ्यांची कामे, मैदान सपाटीकरण, मजगी, गुरांचे शेड, शेळी पालन शेड, कुक्कुटपालन, पांदन रस्ते व कच्ची नाली, घरकुल आदींची कामे यातून करण्यात येत आहेत.
ग्रामपंचायत व विविध विभागाच्या माध्यमातून ही सर्व कामे करण्यात येत आहेत. यात सध्या जिल्ह्यातील ५४० ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ४२४ कामे सुरु आहेत. तर अन्य विभागाच्या माध्यमातून १३१ असे ५५५ कामे सुरु आहेत.
मागीलवर्षी ५२.५० लाखांची कामे करण्यात आली. त्या तुलनेत १ एप्रिल २०१५ पासून आजपर्यंत करण्यात आलेली कामे उद्दीष्टपूर्तीपेक्षा जास्त कामाकडे वाटचाल सुरु आहे. (शहर प्रतिनिधी)