जिल्हा परिषद शाळेचे ३७ विद्यार्थी शिक्षणापासून वंचित
By Admin | Updated: May 13, 2014 23:21 IST2014-05-13T23:21:21+5:302014-05-13T23:21:21+5:30
डोंगरला येथे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत इयत्ता ८ चे वर्ग शैक्षणिक सत्र २0१४-२0१५ पासून सुरू करण्याकरीता शाळा व्यवस्थापन समितीने ठराव मंजूर

जिल्हा परिषद शाळेचे ३७ विद्यार्थी शिक्षणापासून वंचित
तुमसर : डोंगरला येथे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत इयत्ता ८ चे वर्ग शैक्षणिक सत्र २0१४-२0१५ पासून सुरू करण्याकरीता शाळा व्यवस्थापन समितीने ठराव मंजूर करुन गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. परंतु तो ठराव गटशिक्षणाधिकार्यांनी जिल्हा परिषदेकडे पाठविलाच नाही. यामुळे डोंगरला येथे असंतोष व्याप्त आहे. शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार डोंगरला येथील शाळा व्यवस्थापन समितीने नियमानुसार इयत्ता आठवीचे वर्गशैक्षणिक सत्र २0१४-२0१५मध्ये नियमित सुरू करण्याकरीता गटशिक्षणाधिकार्यांकडे ठराव पाठविला होता. शाळा व्यवस्थापन समितीची दि. ६ जानेवारी २0१४ रोजी सभा झाली. दि. २८ फेब्रुवारी रोजी ठरावाची प्रत गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीनिशी पाठविली होती. पुन्हा १ मे २0१४ च्या सभेची प्रत सादर करण्यात आली. जिल्हा परिषद भंडारा येथील कार्यालयाकडे गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून ठराव पाठविण्यात आला नाही. याची चौकशी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शाळा व्ययवस्थापन समितीच्या पदाधिकार्यांनी केल्यावर पंचायत समितीकडून ठरावासहीत प्रस्तावच आला नाही अशी माहिती मिळाली. डोंगरला येथे इयत्ता ५ वी सेमी इंग्रजी करीता शैक्षणिक सत्र २0१३-१४ पासून कार्योत्तर परवानगी मागितलेली आहे. सन २0१४-१५ पासून इयत्ता १ ली व ६ वी ची सेमी इंग्रजी चे वर्ग सुरू करण्यात यावेत व त्याच्या मान्यतेकरीता शिक्षणाधिकारी भंडारा यांना पत्रव्यवहार करण्यात यावा. इयत्ता ७ मध्ये येथे या सत्रात ३७ विद्यार्थी असून आरटीई नियमानुसार १ ते ८ करण्याकरीता शैक्षणिक सत्र २0१४-२0१५ पासून सुरू करावे असा ठराव शाळा व्यवस्थापन समितीने गटशिक्षणाधिकारीकडे पाठविला होता. या प्रकरणाचा जाब विचारण्याकरीता शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थ दि. १२ मे रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात गेले होते. परंतु गटशिक्षणाधिकारी अनुपस्थित होते. दि. १३ रोजी पुन्हा समिती सदस्य व ग्रामस्थांसोबत गेले. तुमसर पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी व्ही.आर. आदमने यांनी आरटीई कायद्याचे उल्लंघन केल्याचे दिसून येते. या प्रकरणात दप्तर दिरंगाई की हेतुपुरस्सर ठराव पाठविला नाही याचा जाब शाळा व्यवस्थापन समितीने विचारला आहे. या प्रकरणाची योग्य व निष्पक्ष चौकशी करुन गटशिक्षणाधिकारीवर कारवाईची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)