कोरोनाच्या सावटात भंडारा जिल्ह्यातील ३४ महाविद्यालये झाली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 15:48 IST2021-02-15T15:47:27+5:302021-02-15T15:48:54+5:30
Bhandara News भंडारा जिल्ह्यात एकूण ७० महाविद्यालय असून त्यापैकी सोमवारी ३४ महाविद्यालये सुरू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

कोरोनाच्या सावटात भंडारा जिल्ह्यातील ३४ महाविद्यालये झाली सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील शाळा उघडल्यानंतर आता महाविद्यालय केव्हा उघडणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू झाली आहेत. भंडारा जिल्ह्यात एकूण ७० महाविद्यालय असून त्यापैकी सोमवारी ३४ महाविद्यालये सुरू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
कोरोना संसर्गाच्या सावटात सुरू झालेल्या महाविद्यालयांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. परंतु कोरोनाबाबत काळजी घेण्यात येत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. भंडारा जिल्ह्यात ७० महाविद्यालये असून सर्वच नागपूर विद्यापीठाशी संलग्नित आहेत. यात भंडारा तालुक्यात १६, लाखनी आणि साकोली प्रत्येकी ८, लाखांदूर ६ तर मोहाडी तालुक्यातील पाच महाविद्यालयांचा समावेश आहे. या महाविद्यालयांपैकी जवळपास ४८ टक्के महाविद्यालय सुरू असल्याचे दिसून आले. यात विद्यार्थ्यांची प्रवेशद्वारावरच चाचणी करीत असल्याचे दृश्य होते. सीनिअर कॉलेजमध्ये येताना प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनी तोंडावर मास्क लावून प्रवेश करत असल्याचे दिसले. त्या सोबतच काही विद्यार्थ्यांच्या बॅगेत सॅनिटायझर होते. कोरोनाचे संक्रमण कमी होत असले तरी आपणच आपली काळजी घ्यावी, असा सूरही विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केला. काही महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांची थर्मल स्कॅनिंगसुद्धा करण्यात आली. विशेष म्हणजे काही प्रसिद्ध महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर व अँटिजेन तपासणीही करण्यात आली. जेणेकरून महाविद्यालय उघडल्यानंतर विद्यार्थ्यांना किंवा अन्य प्राध्यापकांमध्ये कुठलीही भीती राहू नये.
भंडारा शहरातील जे.एम. पटेल महाविद्यालयात याची पूर्वतयारी करण्यात आली होती. १५ दिवसांपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करून महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले जात होते. विशेष म्हणजे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली.
जे. एम.पटेल महाविद्यालयात सीनियर विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुरू करण्यापूर्वी महाविद्यालयातील सर्वच मजल्यांवर विविध महत्त्वाच्या ठिकाणी व प्रयोगशाळांमध्ये सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. महाविद्यालय परिसरात विविध ठिकाणी लिक्विड सोप उपलब्ध करण्यात आले आहे. याशिवाय वर्गखोल्या, कार्यालय, ग्रंथालय व प्रयोगशाळा निर्जंतुक करण्यासाठी पोर्टेबल फॉगिंग मशीनचा वापर केला जात आहे. विद्यार्थी, पालक किंवा प्राध्यापकांनी कुठल्याही बाबतीत घाबरण्याचे कारण नाही.
प्रा. डॉ. विकास ढोमणे
प्राचार्य, जे.एम. पटेल महाविद्यालय भंडारा.
नियमांची काटेकोर अंमलबजावणी
सोमवारपासून महाविद्यालय उघडणार असल्याने अनेक महाविद्यालयांनी याची तयारी केल्याचे दिसून आले भंडारा शहरातील महाविद्यालयांमध्ये याची पूर्वतयारी दिसून आली. ठिकठिकाणी सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच प्रत्येक येणाऱ्या विद्यार्थ्यांची थर्मल स्कॅनिंग व चेहऱ्यावर मास्क आहे किंवा नाही याची शहानिशा केली जात होती. विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने एक दिवसाआड येण्याचेही नियोजन करण्यात आले आहे, जेणेकरून महाविद्यालयातही गर्दी न होता करून संक्रमणाचा धोका टाळता येऊ शकेल.
शाळा सुरू झाल्यानंतर महाविद्यालय कधी सुरू होतात याची आम्हाला आतुरतेने वाट होती. आता महाविद्यालय सुरू झाले असून शिक्षणालाही खऱ्या अर्थाने आता प्रारंभ होणार आहे.
श्रुती लांजेवार, विद्यार्थिनी.
महाविद्यालय सुरू करण्यात यावी, अशी मागणी अभाविपने केली होती. या मागणीला आता पूर्णत्व आले असून महाविद्यालय सुरू झाल्याने आम्हाला याचा आनंद आहे.
रुपेश सपाटे, विद्यार्थी.
महाविद्यालयात आज प्रथमच गेल्यानंतर जुन्या मैत्रिणींची भेट झाली. आता नियमित वर्ग होणार असल्याने शिक्षणात खंड पडणार नाही.
हर्षाली धांडे , विद्यार्थिनी