भंडारा : मानव विकास कार्यक्रमांतर्गत माता व बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाने जननी सुरक्षा योजना सुरू केली. मात्र आरोग्य विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे लाखांदूर तालुक्यात सहा महिन्यात ३२ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीला आली आहे. बालमृत्यू रोखण्यासाठी शासन कोट्यवधी रूपयांचा खर्च करीत आहे. आरोग्यासाठी मोठा निधी देत आहे. परंतु आरोग्यावर कागदोपत्री खर्च होत आहे. आरोग्य विभाग संपूर्ण निधी माता व बालकांसह नागरिकांच्या आरोग्य विषयक उपाययोजनांवर खर्च केल्याचे सांगत आहे. माता व बाल मृत्यू नियंत्रित असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात असले तरी बालकांच्या मृत्यूंचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. लाखांदूर तालुक्यात मागील सहा महिन्यात ३२ बालकांना मृत्यूने कवटाळले असून आरोग्य यंत्रणेविषयी नागरिकांमध्ये रोष आहे. लाखांदूर तालुक्यात बारव्हा, सरांडी, दिघोरी व कुडेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या केंद्रावर मानव विकास कार्यक्रमांतर्गत गरोदर मातांची तपासणी, स्तनदा मातांची तपासणी व शुन्य ते सहा महिने बालकांची मोफत तपासणी बालरोग तज्ज्ञांकडून केली जाते. शिबिरात मोफत औषधी दिली जाते. शिबिराकरिता गरोदर माता, स्तनदा माता व शुन्य ते सहा महिने बालकांना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाहनाने ने-आण केली जाते. यावर शासन वर्षाकाठी कोट्यवधी रूपये खर्च करीत आहे. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात लाखांदूर तालुक्यात ३२ बालकांना जीव गमवावा लागला आहे. यात २० मुल तर १२ मुलींचा समावेश आहे. यातील ९ बालकांचा भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता मृत्यू झाला. उर्वरीत बालकांचा मृत्यू खासगी, शासकीय दवाखान्यात झाला. तर काहींचा मृत्यू ‘रेफर टू भंडारा आणि नागपूर’ या दरम्यान झाला. मृत बालकांमध्ये दोन तासांपूर्वी जन्मलेल्या बालकांपासून ते वर्षभराच्या बालकांचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)
सहा महिन्यात ३२ बालकांचा मृत्यू
By admin | Updated: December 6, 2014 22:42 IST