३० कि.मी. अंतरावर १६ थांबे

By Admin | Updated: March 6, 2015 00:59 IST2015-03-06T00:59:44+5:302015-03-06T00:59:44+5:30

जलद व सुखकारक प्रवासाचा दावा करणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या तुमसर ते भंडारा ३० कि.मी. दरम्यान धावणाऱ्या जलद बसला १६ थांबे दिले आहे.

30km 16 stop at the distance | ३० कि.मी. अंतरावर १६ थांबे

३० कि.मी. अंतरावर १६ थांबे

तुमसर : जलद व सुखकारक प्रवासाचा दावा करणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या तुमसर ते भंडारा ३० कि.मी. दरम्यान धावणाऱ्या जलद बसला १६ थांबे दिले आहे. याकरिता एक तासाचा प्रवास करावा लागतो. तुमसर ते भंडारा व नागपूर करिता जलद व सामान्य (लोकल) बसचे भाडे सारखेच आहे. जलद बसचा पहिला थांबा किमान ६० कि.मी. वर असावा असा नियम आहे. येथील जलद बसची गती केवळ ४० कि.मी. प्रती तास आहे.
तुमसर ते भंडारा पर्यंत जलद बसचे १६ थांबे असल्याने गंतव्य स्थानापर्यंत पोहचण्यास किमान एक तासाचा अवधी लागतो. जलद बस तुमसरवरून सुटल्यावर खापा, मोहाडी येथील न्यायालयाजवळ, बसस्थानक, मोहाडी चौकात, कुशारी फाटा, चौंडेश्वरी माता फाटा, पोलीस ठाणे, मोहगाव देवी, पाचगाव फाटा, सनफ्लॅग फाटक, वरठी टी पॉइंट, भंडारा आयटीआय, लालबहादूर शास्त्री चौक, खामतलाव, राजीव गांधी चौक, त्रिमूर्ती चौक व शेवटी भंडारा बसस्थानक असे थांबे आहेत. तुमसर ते भंडारा सामान्य (लोकल) बसचे २२ ते २५ थांबे आहेत.
जलद बसची गती महामंडळाने ५५ ते ६० इतकी निश्चित केली आहे. येथे ४० च्या वेगाने बस धावत आहे. नियमानुसार जलद बसगाड्यांचा थांबा ६० कि.मी. वर असतो. परंतु मोहाडी तालुक्याचे स्थळ व भंडारा जिल्ह्याचे स्थळ असल्याने दोन थांबेच पाहिजे. परंतु येथे नियमाला बगल दिली आहे. मोहगाव देवी येथे जलद बसचा थांबा विनंतीवरून दिला आहे. विभागीय कार्यालय भंडारा यांनी तसा आदेश दिला आहे.
तुमसर नागपूर जलद बसचे भाडे १०७ रुपये व सामान्य (लोकल) चे बसभाडे १०७ रुपयेच आहे. तिकीट दर निश्चित करण्याचा अधिकार नागपूर विभागीय कार्यालयाला असल्याची माहिती आहे. एका वर्षाआधी तुमसर आगाराला वार्षिक साडे पाच लाखाचा नफा झाला होता. सध्या तो नफा साडेचार लाखावर आला आहे. तुमसर आगारात एकूण ७० बसगाड्या आहेत. या गाड्यांचा मेंटेनन्स बरोबर होत नाही. बसगाड्यात स्वच्छता नाही. बसण्याची व्यवस्था बिकट आहे. बॉडी अँगल शेवटचा श्वास घेत आहेत. येथे जुन्या बसगाड्या अति जलद व जलद गाड्या म्हणून धावत आहेत.
केवळ लांब पल्ल्याच्या नवीन बस धावतात. तुमसर - परतवाडा, अकोला, माहूर, राजूरा या लांब पल्ल्याच्या बस आहेत. वाहकांची संख्या १२३, चालक १६७, वाहकांच्या रिक्त जागा १३ आहेत. वेळ जास्त लागणे व बसगाडे जास्त द्यावे लागत असल्याने येथील जलद गाड्यांना प्रवाशी भेटत नाही. येथे प्रवाशी खासगी गाड्यांचीच जाण्याला प्रथम प्राधान्य देतात. नियम सांगणारे महामंडळाने लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 30km 16 stop at the distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.