२६१ बेरोजगारांना स्वयंरोजगाराचा आधार
By Admin | Updated: August 2, 2014 23:57 IST2014-08-02T23:57:54+5:302014-08-02T23:57:54+5:30
सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. त्यांना रोजगार उपलब्ध होवून ते स्वयंभू व्हावे, यासाठी शासनाने अनेक महामंडळांची निर्मिती केली आहे. जिल्ह्यातील पाच

२६१ बेरोजगारांना स्वयंरोजगाराचा आधार
भंडारा: सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. त्यांना रोजगार उपलब्ध होवून ते स्वयंभू व्हावे, यासाठी शासनाने अनेक महामंडळांची निर्मिती केली आहे. जिल्ह्यातील पाच मागासवर्गीय महामंडळाच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या २६१ बेरोजगारांच्या कर्ज प्रकरणांना जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांच्या अध्यक्षतेखाली मंजुरी देण्यात आली.
सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या पाच मागासवर्गीय विकास महामंडळांच्या कर्ज प्रकरणांचा यात समावेश आहे. या महामंडळामध्ये महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ व इतर मागासवर्गीय विकास महामंडळ यांचा समावेश आहे. २५ जुलैला जिल्हाधिकारी माधवी खोडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यात सुशिक्षित बेरोजगारांनी कर्ज प्रक्रियेकरीता सादर केलेल्या अर्जांवर विचारविमर्श करून त्यांची प्रकरणे निकाली काढली.
या बैठकीला सर्व महामंडळांचे जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य उपस्थित होते. सदर मंजूर प्रकरणांवर बँकाकडे पाठविण्याची शिफारस करण्यात आली आहे. मंजुर प्रकरणांमध्ये महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची १७५, चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ ३९, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ ३९, महाराष्ट्र राज्य वित्तीय विकास महामंडळ ८ अशा २६१ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली. सदर मंजुरी प्राप्त प्रकरणांना बँकांनी १५ आॅगस्टपर्यंत कर्ज प्रकरणी निकाली काढावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी या बैठकीतून दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीत कर्ज प्रकरणाच्या निपटाराने सुशिक्षित बेरोजगारांना स्वत:चा उद्योग करून आत्मनिर्भर होण्याची उत्तम संधी मिळाल्याने २६१ बेरोजगारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.(शहर प्रतिनिधी)