२,५२७ लोकांना १४ कोटींची 'मुद्रा'

By Admin | Updated: March 11, 2016 00:43 IST2016-03-11T00:43:07+5:302016-03-11T00:43:07+5:30

सृूक्ष्म व लघु उद्योजकांना व्यवसाय वाढविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेत ....

2,527 people 'currency' of 14 crores | २,५२७ लोकांना १४ कोटींची 'मुद्रा'

२,५२७ लोकांना १४ कोटींची 'मुद्रा'

देवानंद नंदेश्वर भंडारा
सृूक्ष्म व लघु उद्योजकांना व्यवसाय वाढविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेत जिल्ह्यात २,५२७ लोकांना १३ कोटी ८१ लाख ६८ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. यामध्ये शिशू योजनेत २,३२३ लोकांना, किशोर योजनेत १६६ तर तरूण योजनेत ३८ उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी मुद्रा योजनेमध्ये महिन्याला २० प्रस्ताव देणे आवश्यक आहे. ज्या बँक मुद्रा योजनेंतर्गत कर्ज देत नाहीत, त्यांची तक्रार लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे करावी, असे आवाहन करण्यात आले होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा योजनेचा शुभारंभ केला होता. योजनेचा शुभारंभ होताच आठ दिवसात प्रत्येक बँकेने किमान २५ केसेस मुद्रा योजनेच्या कराव्यात, अशी बंधणे घालून योजना अत्यंत कमी दिवसात किती लोकप्रिय झाली, हे यातून केंद्र सरकारला दाखवून द्यावयाचे होते. त्यानुसार बँकांनीसुद्धा कमी अधिक प्रमाणात या योजनेला बऱ्यापैकी प्रतिसाद दिल्याने ही योजना कमी दिवसात प्रसिद्धीच्या झोतात आली. याबरोबरच ज्या बँका केसेस करण्यात कुचराई करीत होत्या, त्यांच्या तक्रारीसुद्धा मोठ्या प्रमाणावर झाल्या. आता योजना सुरू झाल्यापासून ३१ जानेवारीपर्यंत म्हणजे मागील चार महिन्यात जिल्ह्यातील २३ बँकांनी १३ कोटी ८१ लाख ६८ हजार रुपयांचे वाटप केले. यामध्ये शिशू योजनेमध्ये २,३२३ ग्राहकांना ८ कोटी ३३ लाख ३३ हजार रुपये, किशोर योजनेमध्ये १६६ ग्राहकांना २ कोटी ७९ लाख ८५ हजार रुपये तर तरूण योजनेमध्ये ३८ ग्राहकांना २ कोटी ६८ लाख ५ हजार रुपये असे १३ कोटी ८१ लाख ६८ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले.

बेरोजगारांना स्वत:चा व्यवसाय उभा करून त्यांना स्वत: च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेली मुद्रा योजना उत्तम आहे. या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार मिळेल. त्यामुळे त्यांच्या जीवनमानात नक्कीच वाढ होईल.
- संजय पाठक,
व्यवस्थापक, अग्रणी बँक, भंडारा

सर्वाधिक वाटप विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे
भंडारा जिल्ह्यात २३ बँकांना मुद्रा योजनेचे टार्गेट देण्यात आले होते. यामध्ये सर्वाधिक वाटप विदर्भ कोकण ग्रामीण या बँकेने ३ कोटी ५४ लाख ५ हजार रूपयाचे वाटप केले. ५६६ लाभार्थ्याना हे कर्ज वाटप केले. त्या खालोखाल बँक आॅफ इंडीया ने ६०५ ग्राहकांना २ कोटी २० लाख ७४ हजार रूपयांचे तर तिसऱ्या क्रमांकावर बँक आॅफ महाराष्ट्र बँकेने १३४ ग्राहकांना १ कोटी १६ लाख ६२ हजार रूपयांचे कर्ज वाटप केले. याशिवाय अलाहाबाद बँक, आंध्रा बँक, एक्सीस बँक, भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक, बँक आॅफ बडोदा, कॅनरा बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, देना बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसी बँक, आयडीबीआय बँक, इंडियन ओव्हरसिस बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक आॅफ हैदाबाद, स्टेट बँक आॅफ इंडिया, सिंडिकेट बँक, युको बँक, युनियन बँक आॅफ इंडिया, विदर्भ बँक या बँकानी कर्ज वाटप केले आहे.
तीन टप्प्यात मुद्रा कर्ज योजना
लहान वयापासूनच व्यवसायामध्ये गोडी निर्माण व्हावी, म्हणून शिशू ते तरूण वयापर्यंत अशी तीन टप्प्यात ही योजना आहे. यामध्ये शिशू योजनेत ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होते, किशोर योजनेत ५० हजार ते ५ लाख आणि तरुण योजनेत ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: 2,527 people 'currency' of 14 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.