‘डिजिटल’ शाळेसाठी २५ प्राथमिक शाळांची धडपड
By Admin | Updated: March 4, 2016 00:42 IST2016-03-04T00:36:18+5:302016-03-04T00:42:15+5:30
खाजगी व इंग्रजी कॉन्व्हेंटच्या तुलनेत मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी सक्षम ठरावित, या हेतूने शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणानुसार ...

‘डिजिटल’ शाळेसाठी २५ प्राथमिक शाळांची धडपड
युवराज गोमासे करडी (पालोरा)
खाजगी व इंग्रजी कॉन्व्हेंटच्या तुलनेत मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी सक्षम ठरावित, या हेतूने शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणानुसार करडी व पालोरा केंद्रातील २५ शाळांनी महिन्याभरात गुणवत्ता व दर्जेदार शिक्षणासाठी डिजिटल शाळा करण्याचे ठरविले आहे. शिक्षण विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांची त्यासाठी धडपड सुरू आहे. लोकवर्गणीतून जांभोराटोला शाळा डिजिटल झाली असून प्रोजेक्टरच्या माध्यमातून अध्ययन व अध्यापन केले जात आहे.
जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमालीची रोडावली आहे. शाळांच्या तुकड्या कमी होऊन शाळांना पुरेशे विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. विद्यार्थी संख्या घटल्याने अनेक मराठी शाळांवर अवकळा आली असून शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. शिक्षक अतिरिक्त ठरून समायोजनाचा गंभीर प्रश्न शासनासमोर उभा ठाकला आहे.
शासनाच्या धोरणानुसार मोहाडी तालुक्यातील करडी व पालोरा केंद्रातील २५ शाळांनी शाळा महिन्याभरात डिजिटल करण्याची मोहिम हाती घेतली आहे. लोकसहभाग व लोकवर्गणीतून सदर उदिष्ट्ये गाठण्याचा मानस व्यक्त केला जात आहे. शिक्षण विस्तार अधिकारी पी.डी. गणवीर यांचे नेतृत्वात मुख्याध्यापक व शिक्षक धडपडत असून पालकांचा पाठिंबा लाभत आहे. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून मॅग्नीफाईड ग्लास आधारे मोबाईल अॅप्सचे माध्यमातून प्रत्येक वर्गात अध्ययन व अध्यापन करण्याचा संकल्प शाळांचा आहे. यासाठी कार्यशाळेतून शिक्षकांना प्रेरित व प्रशिक्षित केले जाणार आहे.
जांभोराटोलाचा १०० टक्के निकाल
जांभोराटोला जि.प. प्राथमिक शाळेत वर्ग १ ते ४ असून विद्यार्थी पटसंख्या ३० आहे. शिक्षक संख्या २ असून मुख्याध्यापक शिवराज राठोड, शिक्षक कमलेश दुपारे अध्यापनाचे करीत आहेत. दोन्ही शिक्षकांनी शाळा १०० टक्के डिजिटल करण्याचे ठरविले. त्यासाठी लोकवर्गणी जमा करण्यात आली. या शाळेतील शिक्षकांची शाळेप्रती समर्पण भावना लक्षात घेत, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अभयसिंह परिहार यांनी १० हजारांची देणगी दिली. शिक्षण विस्तार अधिकारी प्रदीप गणवीर यांना एक संगणक संच दिला. जि.प. सदस्या निलिमा इलमे यांनी दोन हजार, माजी जि.प. सदस्य महेंद्र शेंडे यांनी पाचशे रूपयांची देणगी दिली. यातून प्रोजेक्टर विकत घेण्यात आले असून १०० टक्के शाळा डिजिटल झाली आहे.