२३५ शेतकरी आत्महत्या मदतीस अपात्र
By Admin | Updated: February 25, 2015 01:12 IST2015-02-25T01:12:36+5:302015-02-25T01:12:36+5:30
निसर्गाच्या लहरीपणामुळे सततची नापिकी व वाढणाऱ्या कर्जाच्या डोंगरामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी न होता वाढतच असून, ...

२३५ शेतकरी आत्महत्या मदतीस अपात्र
देवानंद नंदेश्वर भंडारा
निसर्गाच्या लहरीपणामुळे सततची नापिकी व वाढणाऱ्या कर्जाच्या डोंगरामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी न होता वाढतच असून, गत १५ वर्षात भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत ३६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र शासनाच्या निकषावर यातील २३५ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत.
शेतात केलेला लागवडीचा खर्च. हाती आलेले उत्पन्न आणि मिळणारा दर. यात प्रचंड तफावत असून, यासोबतच सिंचनाअभावी बारमाही पीक घेता येत नाही, शेतीला जोडधंदा नसल्याने हातात पैसा खेळत नाही. परिणामी, वाट्याला आलेल्या कर्जबाजारीपणामुळे आलेल्या नैराश्यापोटीच जीवनाचा डाव हरलो, या भावनेपोटी जिल्ह्यात मागील १५ वर्षात ३६१ शेतकऱ्यांनी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी राज्य शासनाच्या निकषाप्रमाणे पात्र ठरलेल्या १२२ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली.
२३५ शेतकऱ्यांचा मृत्यू आजारपणा, व्यसनाधिनता, अपघात, बेरोजगारी, घरगुती भांडण आदी कारणांमुळे झाला असल्याचे निष्कर्ष शासनाकडून लावण्यात आले. यामुळे अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत नाकारण्यात आलेली आहे.
जानेवारी २०१५ मध्ये शेतकऱ्यांच्या तीन आत्महत्या झाल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली नाही.
त्यांना मदतीसंदर्भात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
२०१४ मध्ये २४ प्रकरणे अपात्र
नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे अन्नदाता शेतकरी कंगाल झाला. भिकेला लागला. यामुळे आत्महत्येचे सत्र सुरु आहे. २०१४ जानेवारी ते डिसेंबर या वर्षभरात जिल्ह्यात ३६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या नोंदविल्या गेल्या. यापैकी ११ प्रकरणं पात्र ठरुन त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली. तर २४ प्रकरणं अपात्र ठरली; मात्र विविध कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे एक प्रकरणं लालफितशाहीत अडकली असून, शासन दरबारी प्रलंबित आहेत.