मजुरांना घेऊन जाणारी टाटा सुमो उलटली, २१ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 14:37 IST2021-11-24T14:12:42+5:302021-11-24T14:37:16+5:30
रामटेक राज्यमार्गावर वासेरा या गावाजवळ मिरची तोड करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारी टाटा सुमो उलटून २१ जण गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारार्थ भंडारा व तुमसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मजुरांना घेऊन जाणारी टाटा सुमो उलटली, २१ जण जखमी
भंडारा : तुमसर रामटेक राज्यमार्गावर वासेरा या गावाजवळ मिरची तोड करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारी टाटा सुमो उलटली. ही घटना आज सकाळी १० वाजता वासेरा गावाजवळ घडली. या घटनेत २१ जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये १९ महिला, चालक व एका ४ वर्षीय मुलाचा समावेश आहे. या सर्वांना उपचारार्थ भंडारा व तुमसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या सर्व महिला आज सकाळी नऊ वाजता टाटासुमो (क्रमांक ३६/ ५५ ५२) या वाहनाने पिटेसुरवरून नागपूर जिल्ह्यातील येथील बेडेपार गावात मिरची तोडण्या करता जात होत्या. दरम्यान, आज सकाळी १० वाजता वासेरा गावाजवळ ही सुमो उलटली. यात गाडीचा पार चेंदामेंदा झाला, सुदैवाने जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच आंधळगाव येथील पोलीस कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले व जखमींना उपचारार्थ रुग्णालयात पाठवलं.
जखमींमध्ये ओमलता धनपाल नेवारे (वय २९), कल्पना पितांबर खोब्रागडे (वय ४५), दिपाली पितांबर खोब्रागडे (वय २१), संगमित्रा गेडाम (वय ५०), लक्ष्मी रंगराव ऊके (वय ५०), अंजनी ज्ञानेश्वर उके(वय ५५), सुकेश्र्नी राजेंद्र तिरपुडे (वय ३२), अनिता सुरेश अडमाचे (वय ३५), उषा सुरेश राऊत (वय ३८), आरती मुलचंद नेवारे (वय २१), वैशाली चंदन उके (वय ३५), लता संतोष साखरे (वय ३८), शीला राजेंद्र साखरे (वय ३५), सुरेखा गोपाल शेंडे (वय ३१), चंद्रकला जीवन चौधरी (वय ६०), परमिला चित्र पाल बिंजेवार (वय ४८), निरंजना तागडे (वय ४१), मनीषा ईश्वर द्याल शेंडे (वय ४०), माया परमेश्वर ऊके (वय ५०) सर्व राहणार पिटेसुर तालुका तुमसर जिल्हा भंडारा यांचा समावेश आहे. तर, टाटा सुमो चालक परमेश्वर इशरत ऊके (व४०) व मुलगा प्रियांश परमेश्वर ऊके (वय ४) हे सुद्धा गंभीर जखमी असून त्यांना उपचारार्थ भंडारा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माहिती मिळताच आंधळगाव पोलीस ठाण्याचे किरण अवतारे, गणेश मते पाठक सिंगन जुडे फुल मुंडे यांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात पाठविण्याची दखल घेतली असून पुढील तपास सुरू आहे.