प्रकल्पात १८ टक्के जलसाठा
By Admin | Updated: January 11, 2016 00:31 IST2016-01-11T00:31:16+5:302016-01-11T00:31:16+5:30
जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस बरसला नाही. जिल्ह्यातील ४ मध्यम आणि ३१ लघु प्रकल्पांपैकी ५0 टक्के प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा नाही.

प्रकल्पात १८ टक्के जलसाठा
पावसाची टक्केवारी कमी : उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचे संकेत
भंडारा : जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस बरसला नाही. जिल्ह्यातील ४ मध्यम आणि ३१ लघु प्रकल्पांपैकी ५0 टक्के प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा नाही. २८ जुने मालगुजारी तलावात २६.९५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जानेवारी महिन्याच्या दुसरा आठवड्यात जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पांत फक्त १८.१२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे उन्हाळ्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे. शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ ५५ टक्के पाण्याचा साठा आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांत १२.८८ जलसाठा होता. मात्र, पाऊस कमी पडल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जलसाठयात ०.७८ टक्क्यांनी घट झाली आहे. लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे.
सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी ८.४०१, बघेडा २२.८७४ टक्के जलसाठा आहे. बेटेकर बोथली व सोरणा जलाशयात जलसाठ्याची नोंद ० आहे. चारही मध्यम प्रकल्पात ८.९ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी चार मध्यम प्रकल्पात १० जानेवारीपर्यंत ८.०९ टक्के जलसाठा शिल्लक होता.
जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे. सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा २१.९६ टक्के आहे. माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा २६.९५ टक्के आहे.
३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरमडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी. पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कातुर्ली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार या प्रकल्पांचा समावेश आहे. गोसेखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा असला तरी शहरातील नागरीकांना पाण्याची टंचाई भासत आहे.
अनेक भागात नळाद्वारे दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळा संपण्याचा स्थितीत असतांनाही जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ २२.०६३ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे. मागील वर्षी च्या तुलनेत यावर्षी पावसाची सरासरी कमी असल्याने उन्हाळ्यात पाण्याचे संकट बळावणार यात तिळमात्र शंका नाही. वैनगंगा नदीत भरपुर जलसाठा असला तरी नियोजन शून्य कारभारामुळे नागरिक पाण्यासाठी तरसणार आहेत. (प्रतिनिधी)