१.७३ कोटी रुपयांचे धानाचे देयक रखडले
By Admin | Updated: July 23, 2015 00:31 IST2015-07-23T00:31:45+5:302015-07-23T00:31:45+5:30
पणन महामंडळाने पवनी तालुक्यातील पवनी, कोंढा, आसगाव, अड्याळ या चार धान खरेदी केंद्रावर रबी धानाची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली.

१.७३ कोटी रुपयांचे धानाचे देयक रखडले
प्रकरण धान खरेदीचे : ३.२८ कोटींसह बोनसचे पैसे मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
खेमराज डोये आसगाव
पणन महामंडळाने पवनी तालुक्यातील पवनी, कोंढा, आसगाव, अड्याळ या चार धान खरेदी केंद्रावर रबी धानाची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. मात्र आतापर्यंत धान खरेदीपैकी ३.२८ कोटी व बोनसपैकी १.७३ कोटी रुपयांचे चुकारे अडून आहेत.
पवनी धान खरेदी केंद्रावर रबी धान पिकाची ९,९०६ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. त्याची रक्कम १ कोटी ३४ लाख ७२ हजार रुपये एवढी होते. त्यापैकी ५० लाख ५० हजार रुपयांचे चुकारे दिले तर ८४ लाख २१ हजार रुपये शिल्लक आहेत. आसगाव केंद्रावर १३ हजार ४५६ क्विंटल खरेदी धान करण्यात आले. त्याची किंमत १ कोटी ८३ लाख रुपये होते. त्यापैकी ४८ लाख ९ हजार रुपयांचे पेमेंट मिळाले आहेत. तर १ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांचे चुकारे थकीत आहे.
कोंढा केंद्रावर ९ हजार २५२ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. त्याची किंमत १ कोटी २५ लाख ८२ हजार रुपये होते. त्यापैकी ५३ लाख २२ हजार रुपयांचे पेमेंट झाले आहेत तर ७२ लाख ६० हजार रुपयांचे देयके थकित आहे. अड्याळ केंद्रावर ३ हजार, ९७१ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. त्यांची किंमत ५४ लाख १ हजार रुपये होते. त्यापैकी १७ लाख रुपयांचे पेमेंट प्राप्त झालेले आहेत. तर ३६ लाख ३९ हजार रुपयांचे देयके थकित आहेत.
पवनी, आसगाव, कोंढा, अड्याळ या चार केंद्रावर तालुक्यात ३६ हजार ५८६ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. त्याची किंमत ४ कोटी ९७ लाख ५७ हजार रुपये होते. त्यापैकी १ कोटी ६९ लाख रुपयाचे पेमेंट प्राप्त झाले आहेत. तर खरेदी पैकी ३ कोटी २८ लाख रुपयाचे चुकारे थकित आहे.
बोनसपैकी खरीप - २०१५ मधील ८१ लाख ८२ हजार रुपयाचे व उन्हाळी रबीपैकी ९१ लाख ४६ हजार रुपयाचे बोनस थकित आहे. त्यामुळे दोन्ही बोनसपैकी १ कोटी ७३ लाख २९ हजार रुपयाचे बोनस शेतकऱ्यांना शासनाने आतापर्यंत दिलेले नाही. पुढील हंगामासाठी पैसा कुठून आणायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे शेतकरी आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विकून त्रस्त झाले आहेत. त्यामुळे खरेदी केलेल्या धानाचे चुकारे व खरीप व रबी खरेदीवरील धान खरेदीचे बोनसचे देयके देण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.