वर्षभरात १७ लाचखोर अडकले जाळ्यात
By Admin | Updated: September 17, 2014 23:34 IST2014-09-17T23:34:53+5:302014-09-17T23:34:53+5:30
भ्रष्ट्राचार थांबवा देश वाचवा, ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ‘पंच लाईन’ असले तरी लाच घेणाऱ्यांची व देणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. भंडारा जिल्ह्यात मागील दहा महिन्यात १७ लाचखोर

वर्षभरात १७ लाचखोर अडकले जाळ्यात
भंडारा : भ्रष्ट्राचार थांबवा देश वाचवा, ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ‘पंच लाईन’ असले तरी लाच घेणाऱ्यांची व देणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. भंडारा जिल्ह्यात मागील दहा महिन्यात १७ लाचखोर अधिकाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांनी दिली.
येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी या कार्यालयातील उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी जाधव म्हणाले, वर्षभरात नागपूर कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सहा जिल्ह्यांमध्ये वर्षभरात एकूण १०५ लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. यातील सर्वाधिक संख्या शासकीय कर्मचाऱ्यांची आहे. लाच घेण्यामध्ये विभागांतर्गत महसूल (२० प्रकरणे), पोलीस (१५ प्रकरणे), विद्युत विभाग (१० प्रकरणे), पंचायत समिती (८), शिक्षण (६), जिल्हा परिषद (५), भूमिअभिलेख विभाग (७) तर उपप्रादेशिक परिवहन विभागातील २ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
भंडारा जिल्ह्यात सन २०१३ मध्ये ११ जणांना लाच घेताना पकडण्यात आले तर २०१४ मध्ये १७ जणांना पकडण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात सन २००३ पासून ते आतापर्यंत ६७ प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहे. लाच घेणे व देणे हा गुन्हा असून भ्रष्ट्राचारावर अंकुश लावण्याबाबत महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणात जनजागृती कार्यक्रम हाती घेतला आहे. यासंदर्भात प्रत्येक शासकीय, निमशासकीय तसेच सार्वजनिक स्थळी घोषवाक्य, पाम्प्लेट तथा ठिकठिकाणी सिडीद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. पत्रकार परिषदेला भंडारा ऐसीबीचे उपअधीक्षक प्रशांत कोलवाडकर, पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)