१,५७१ कृषिपंपांना हवाय ‘करंट’

By Admin | Updated: May 18, 2015 00:32 IST2015-05-18T00:32:31+5:302015-05-18T00:32:31+5:30

केंद्रासह राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवीत असले तरी भंडारा जिल्ह्यातील मागील वर्षीचे १,५७१ कृषिपंप ..

1,571 farmers want 'current' | १,५७१ कृषिपंपांना हवाय ‘करंट’

१,५७१ कृषिपंपांना हवाय ‘करंट’

हंगामाची चिंता : पैसे भरूनही जोडणीसाठी होतोय विलंब, सर्वाधिक प्रकरणे लाखनी तालुक्यातील
देवानंद नंदेश्वर भंडारा
केंद्रासह राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवीत असले तरी भंडारा जिल्ह्यातील मागील वर्षीचे १,५७१ कृषिपंप वीजजोडणीपासून प्रलंबित आहेत़ याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून ते संकटात सापडलेले आहेत़ प्रलंबित असलेली वीजजोडणी यावर्षीच्या सत्रात पूर्ण करण्याचा लक्षांक वीज वितरण कंपनीला दिला असला तरी वीज पंपांना अजुनही ‘करंट’ मिळालेला नाही.
जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका सहन करावा लागत आहे़ कधी ओला तर कधी सुका दुष्काळ यामुळे शेतकरी पूर्णत: खचलेला आहे़ शेतकऱ्यांचे जीवनमान उचवावे, यासाठी शासनाने शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या सहायाने शेती करण्यासाठी विशेष योजना आखली़
कृषिपंपाच्या साहाय्याने खरिपासह रबी पिकांची लागवड करावी, कृषिपंपामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे, अशी अपेक्षा शासनाची आहे़ परंतु भंडारा जिल्ह्यात ३१ मार्च अखेरपर्यंत १,५७१ कृषिपंपाचची वीजजोडणी प्रलंबित आहे़
यामध्ये भंडारा तालुक्यातील २३८, मोहाडी तालुक्यातील २१०, तुमसर - ९३, पवनी - २०८, साकोली - २६९, लाखनी - ४३४, तर लाखांदूर तालुक्यात ११९ वीज जोडणी प्रलंबित आहे़ प्रलंबित वीजजोडणी २०१५-१६ मध्ये पूर्ण करण्याचा लक्षांक जिल्हा प्रशासनाचा आहे़ सदर जोडणी दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे़ यात पहिल्या टप्प्यांमध्ये ६२९ वीजजोडणी सहा महिन्यांमध्ये तर एक वर्षामध्ये ९४२ वीजजोडणी करण्यात येईल़
वीज वितरण कंपनीकडून देण्यात येणारी कृषिपंप वीजजोडणी दि़३१ मार्च २०१४ अखेर १,५३२ इतकी प्रलंबित होती़ २०१४-१५ या वर्षात २,७९८ कृषिपंप वीज जोडणीचे अर्ज प्राप्त झाले़ त्यामुळे ३१ मार्च २०१५ पर्यत एकुण ४,३३० अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २०१४-१५ मध्ये भंडारा जिल्ह्यात २,७५९ वीजजोडणी करण्यात आली़ यात भंडारा तालुक्यात १९२, मोहाडी तालुक्यात १८६, तुमसर तालुक्यात १६२, पवनी तालुक्यात ६७६, साकोली तालुक्यात ५११, लाखनी तालुक्यात ५२६ तर लाखांदूर तालुक्यात ५०६ वीज जोडणीचा समावेश आहे़
३१ मार्च २०१४ अखेर १,५३२ कृषिपंपाची वीज जोडणी प्रलंबित होती़ यामध्ये भंडारा तालुक्यात २०५, मोहाडी तालुक्यात ३३६, तुमसर तालुक्यात ९८, पवनी तालुक्यात ३३९, साकोली तालुक्यात २११, लाखनी तालुक्यात २८२ तर लाखांदूर तालुक्यात ६१ वीज जोडणींचा समावेश होता़ सन २०१४-१५ यावर्षात २,७९८ अर्ज वीज वितरण कंपनीकडे प्राप्त झाले़ यामध्ये भंडारा तालुक्यात २२५, मोहाडी तालुक्यात ६०, तुमसर तालुक्यात १५७, पवनी तालुक्यात ५४५, साकोली तालुक्यात ५६९, लाखनी तालुक्यात ६७८ तर लाखांदूर तालुक्यात ५६४ अर्ज वीजजोडणीसाठी प्राप्त झाले होते़ मागील वर्षीचे प्रलंबित १,५७१ वीज जोडणी सन २०१५-१६ वर्षात पूर्ण करण्याचा उदिष्ट आहे़ खरीप आणि रबी, अशा दोन्ही हंगामात उत्पादन घेता यावे म्हणून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी विविध योजनांतर्गत शेतात विहिरी व बोअर केल्या आहेत. यानंतर वीज पुरवठ्यासाठी वीज वितरणकडे रितसर अर्ज केले. त्यासाठी आवश्यक त्या रकमेचा भरणाही केला; पण २०१५ अखेरपर्यत जिल्ह्यातील तब्बल एक हजार ५७१ शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. यामुळे विहीर आणि पाणी असताना सिंचन करणे अशक्य आहे. योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात सिंचन विहिरी खोदून देण्याच्या योजना आखल्या. योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीसाठी अर्ज केले. त्यानुसार विहिरी मंजूर झाल्या. खोदकाम, बांधकामही पार पडले. याला एक ते अडीच वर्षांचा कालावधी लोटला; पण त्या विहिरी शेतकऱ्यांच्या उपयोगी पडल्या नाहीत. विहिरी पूर्ण झाल्यानंतर वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांनी विद्युत कंपनीकडे रितसर अर्ज केले. यासाठी लागणारी अनामत रक्कमही शेतकऱ्यांनी अदा केली. आता वीज पुरवठा होईल, अशी अपेक्षा असताना गत अडीच वर्षांपासून शेतकऱ्यांना वीज जोडणीच मिळाली नाही, हे वास्तव आहे.सध्या कडक उन्हाळाही सुरू आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत मान्सूनचे आगमन झाल्यास शेतकरी पेरते व्हा चा नारा देतात; पण गत काही वर्षांत पावसाची अनियमितता मोठे संकट निर्माण करते. अनेकदा पाऊस लांबतो. यामुळे पेरण्या खोळंबतात. परिणामी, उत्पन्नावर विपरित परिणाम होतो.

मागीलवर्षी १,५३२ कृषिपंप वीजजोडणीचे लक्ष्य देण्यात आले होते. या उद्दिष्टाची पूर्तता करण्यात आली. २०१४-१५ मध्ये भंडारा जिल्ह्यात २,७५९ वीजजोडणी करण्यात आली़ प्रलंबित १,५७९ कृषिपंपाची जोडणी यावर्षीचे उद्दिष्ट आहे. यावर्षी देखील शेतकऱ्यांना कृषिपंपाचा लाभ घेता येईल, यासाठी वीज वितरण कंपनी कामाला लागली आहे.
- सतीशकुमार मेश्राम,
अधीक्षक अभियंता,
वीज वितरण कंपनी, भंडारा,

Web Title: 1,571 farmers want 'current'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.