वाकल ते हरदोली हा १.५ किमीचा रस्ता अक्षरशः फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:35 IST2021-04-08T04:35:25+5:302021-04-08T04:35:25+5:30
पालांदूर : गत पाच ते सात वर्षांपासून वाकल ते हरदोली हा १.५ किमी रस्ता अक्षरशः फुटला आहे. लाखांदूर- लाखनी ...

वाकल ते हरदोली हा १.५ किमीचा रस्ता अक्षरशः फुटला
पालांदूर : गत पाच ते सात वर्षांपासून वाकल ते हरदोली हा १.५ किमी रस्ता अक्षरशः फुटला आहे. लाखांदूर- लाखनी या दोन तालुक्यांना जोडणारा रस्ता दुर्लक्षित झाल्याने दोन्ही तालुक्यातील रहदारी संकटात आलेली आहे. रात्रीच्या वेळेस या रस्त्यावर अपघात घडतात. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने पुढाकार घेत सदर रस्त्याला न्याय द्यावा,अशी अपेक्षा कमलेश जीभकाटे यांनी व्यक्त केली आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्यांची देखभाल दुरुस्ती संबंधित यंत्रणेवर असते. त्या भागातील जिल्हा परिषद सदस्य याकरिता लक्ष ठेवून असतात. परंतु मासळ जिल्हा परिषद क्षेत्र व पालांदूर जिल्हा परिक्षेत्र यातील जिल्हा परिषद सदस्यांनी अपेक्षित प्रयत्नांची पराकाष्टा न केल्याने सदर रस्ता आजही दुर्लक्षित आहे. हा रस्ता शेतकरी वर्गाला अत्यंत महत्त्वाचा आहे. चुलबंद खोऱ्यातून भाजीपाल्याची आवक मोठ्या बाजारात पवनी शहरापर्यंत नेण्याकरिता हा रस्ता बहुमोल आहे. तई, बेलाटी, पाचगाव, या परिसरातून हजारो लोक पालांदूरला दररोज प्रवास करीत आहेत. सुजाण नागरिकांनी या रस्त्याच्या बाबतीत वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. तरीपण बांधकाम विभागाने अपेक्षित काळजी केलेली नाही.
पालांदूर हे सर्व दृष्टीने ग्रामीण भागाचे विकास केंद्र म्हणून नावारूपास आलेले आहे.
त्यादृष्टीने परिसरातील ७० ते ८० गावातील जनता रोज पालांदूरला येतात. पालांदूर परिसरातील चौफेर रस्ते असेच फाटले म्हणावे की फुटले म्हणावे तसे दिसतात. ग्रामीण रस्त्यांची संपूर्णतः वाट लागलेली आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने पालांदूर परिसरातील रस्त्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
कोट बॉक्स
वाकल ते हरदोली रस्त्याची संपूर्णतः चाळण झालेली आहे. रस्त्यावरील दगड वर आले आहेत. लहान चाकांच्या वाहनांना रस्ता शोधताना अपघात हमखास ठरला आहे. सदर दीड किलोमीटरचा रस्ता दुरुस्त करणे, अत्यंत आवश्यक आहे.
कमलेश जिभकाटे,
नियमित प्रवासी, पवनी.
हरदोली पर्यंतचा रस्ता दुरुस्त करण्यात यावा, याकरिता यापूर्वी जिल्हा प्रशासनाला लेखी पत्र व्यवहार केलेला आहे. परंतु निधीची समस्या सांगून प्रकरणाला केराची टोपली दाखविण्यात आलेली आहे. संबंधित अभियंत्यांनी किमान फुटलेल्या रस्त्याला समांतरण तरी करावे. रस्त्यावर गिट्टी आहेच. त्यात थोडासा मुरमाचा मुलामा देत तात्पुरत्या स्वरूपात का होईना रस्त्याला न्याय देणे आवश्यक आहे.
-टिकाराम तरारे, सरपंच वाकल
बॉक्स
वाकल ते हरदोली या रस्त्याला हक्काचा कर्तबगार सामाजिक पुढारी अपेक्षित आहे. बांधकाम विभागाच्या अभ्यासानुसार एक किलोमीटरला ३० लक्ष रुपये अपेक्षित आहेत. या दीड किलोमीटर रस्त्याला ४५ लक्ष रुपयाची गरज आहे. एवढा निधी मंजूर करण्याकरिता सक्षम नेतृत्व आवश्यक आहे. नेमके हेच नेतृत्व कमी पडल्याने कित्येक दिवसापासून रस्ता खस्ता खात आहे. या रस्त्याच्या बांधकामाच्या नियोजनाचा वेळापत्रक जून महिन्यात ठरतो. यावेळी या परिसरातील पुढाऱ्यांनी मनावर घेतल्यास निश्चितच या रस्त्याला नियोजनात न्याय मिळू शकतो. कोरोना संकटाने निधीच्या वानवा आहे. मात्र नियमित सदर रस्त्याच्या बाबतीत अपेक्षित पुढाऱ्यांनी प्रयत्न केल्यास निश्चितच हा रस्ता सुधारू शकतो, असे अभ्यासाअंती पुढे आलेले आहे.