दोन वर्षांपासून रमाई आवासचे १३८ घरकुल रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:36 IST2021-01-19T04:36:44+5:302021-01-19T04:36:44+5:30
शासनाच्या रमाई आवास योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना गत २०१९ - २० या वर्षात तालुक्यात १३८ घरकुले मंजूर करण्यात ...

दोन वर्षांपासून रमाई आवासचे १३८ घरकुल रखडले
शासनाच्या रमाई आवास योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना गत २०१९ - २० या वर्षात तालुक्यात १३८ घरकुले मंजूर करण्यात आली. या मंजुरीअंतर्गत जवळपास सर्वच लाभार्थ्यांचे करारनामेदेखील झाल्याची माहिती आहे. मात्र, करारनामे करूनही या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अग्रिम धनादेश देण्यात न आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. घरकुल मंजूर होताच तालुक्यातील काही लाभार्थ्यांनी करारनामा आटोपून नवीन घरकुल बांधकामासाठी जुनी घरे नाहीशी केल्याने अनेक कुटुंबे कुटुंबासह उघड्यावर वास्तव्यास असल्याची दुर्दैवी चर्चा आहे. तालुक्यात ३ हजार ६४६ घरकुलांना शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजुरी देत निधी उपलब्ध करण्यात आला असताना रमाई आवासचे काय....? असा संतप्त सवाल सर्वत्र केला जात आहे. याप्रकरणी, शासनाने तत्काळ दखल घेऊन दोन वर्षांपासून निधीअभावी रखडलेले तालुक्यातील १३८ घरकुलांचे बांधकाम होण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी तालुक्यातील पीडित लाभार्थ्यांनी केली आहे.