१३ गावांत दारुबंदी :१५ गावे तंटामुक्त
By Admin | Updated: March 11, 2015 00:50 IST2015-03-11T00:50:49+5:302015-03-11T00:50:49+5:30
करडी परिसर नक्षलग्रस्त क्षेत्रात मोडतो. सन १९९९ ला कोका जंगल टेकड्यांच्या पायथ्यांशी वसलेल्या किसनपूर व केसलवाडा गावात नक्षल्यांनी कारवाया केल्याची नोंद पोलीस अभिलेखात आहे.

१३ गावांत दारुबंदी :१५ गावे तंटामुक्त
करडी (पालोरा) वार्ताहर
करडी परिसर नक्षलग्रस्त क्षेत्रात मोडतो. सन १९९९ ला कोका जंगल टेकड्यांच्या पायथ्यांशी वसलेल्या किसनपूर व केसलवाडा गावात नक्षल्यांनी कारवाया केल्याची नोंद पोलीस अभिलेखात आहे. सन १९६२ ला करडी येथे पोलीस चौकीची स्थापना झाली. मोहाडी ठाण्याचे अंतर ४० कि.मी. तर जिल्हा ठिकाणाचे अंतर ६० कि.मी. आहे. अगोदर येथे जंगल कायदा पहावयास मिळत होता. पोलीस व कायद्याचा धाक दिसत नव्हता. त्यामुळे चोरी, गुन्हेगारी, अवैध व्यवसाय, जुगार, पत्ते, कोंबडा बाजार, रेती तस्करी, अवैध वाहतुक यामुळे संपूर्ण परिसर त्रस्त होता. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमी उद्भवायचा. मात्र खमक्या पोलिसांमुळे चित्र बऱ्याच अंशी पालटले आहे.
चौकी भाड्याच्या घरात
सन १९६२ पासून करडी पोलीस दूरकेंद्र स्वत:च्या इमारतीअभावी किरायाचे घरात आहे. सन १९८७ पर्यंत मस्जिद परिसरात तर सध्या नामदेव आत्माराम कानतोडे यांच्या घरी बस्तान मांडले आह. सन २०१४ मध्ये चौकीकरिता कार्यालयीन इमारत व दोन निवासस्थानाचे बांधकाम झाले. सध्या आवारभिंतीचे काम सुरु आहे.
वाहन व्यवस्था नाही
चौकी कार्यक्षेत्रात २७ गावे व ३७ चौ.कि.मी. चा परिसर आहे. मात्र चौकीसाठी चारचाकी वाहन नाही. एकच दुचाकी आहे. दुचाकी एक पोलीस तीन. बहुत नाइंसाफी है. आरोपी कुठे बसवायचा हा प्रश्न येतो. त्यामुळे पोलीस स्वत:चे वाहनाने कर्तव्य बजावतात. एखादी मोठी घटना घडल् यास किंवा दंगा झाल्यास त्यावर अंकुश लावण्यासाठी मोहाडी येथून येणाऱ्या वाहनांची वाट पाहावी लागते. अपघातात जखमींना व मृतकांना नेण्यासाठी खागी वाहन पहावे लागते.
पोलीस ठाण्याचा प्रस्ताव अधांतरी
राज्याचे माजी गृहमंत्री स्व.आर.आर. पाटील यांनी करडी क्षेत्रासाठी सन २०१३-१४ मध्ये पोलीस ठाणे मंजूर केले. सन १९६२ पासूनची मागणी २०१४ मध्ये फळाला आली. म्हणून नागरिकांनी आनंद व्यक्त केला. मात्र सदर प्रस्ताव व मंजुरी अधांतरी लटकल्यासारखी अवस्था आहे. लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष आहे. चौकी इमारत व निवासांचे बांधकाम झाले मात्र ठाण्याच्या कामाला कुठेचसुरुवात झालेली नाही.
अपघातातील मदत, लोकोपयोगी उपक्रम
पोलिसांच्या सहकार्यामुळे परिसरातील पांजरा, बोरी, ढिवरवाडा, डोंगरदेव, बोंडे, खडकी, बोरगाव, मुंढरी खुर्द, निलज खुर्द, निलज बुज, नवेगाव, दवडीपार, जांभळापाणी आदी १३ गावात दारुबंदी कायम आहे. १५ गावे तंटामुक्त पारितोषिकासाठी पात्र ठरली. निधी मिळाला. रस्ता सुरक्षा सप्ता, एक गाव एक गणपती, दुर्गोत्सव कार्यक्रम राबविला जात आहे. कायदा, सुव्यवस्था, शांतता व सुरक्षा अबाधित आहे. महिला व तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून उर्वरित गावे तंटामुक्त करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. अपघातात त्वरीत मदत दिली जाते. प्रकरण अंगावर शेकतात. पोलिसांचा ससेमिरा लागतो म्हणून टाळाटाळ करणारे नागरिक पोलिसांच्या प्रोत्साहनामुळेच मदतीला निसंकोचपणे धावत आहेत.