१३ शाळांचा वाजणार ‘दि एण्ड’चा ठोका!
By Admin | Updated: May 6, 2015 00:46 IST2015-05-06T00:46:01+5:302015-05-06T00:46:01+5:30
जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे मराठी शाळा ओस पडत

१३ शाळांचा वाजणार ‘दि एण्ड’चा ठोका!
प्रशांत देसाई भंडारा
जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे मराठी शाळा ओस पडत चालल्या आहेत. इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या जिल्ह्यातील तेरा शाळांमधील पटसंख्या चारच्या आत असल्याने पूर्णत: दैनावस्था झाली आहे. या शाळांचा ‘दि एण्ड’चा ठोका कधीही वाजू शकतो, अशी परिस्थिती असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंटची संस्कृती सर्वत्र फोफावली आहे. त्यामुळे स्पर्धेच्या युगात पाल्य टिकला पाहिजे, यासाठी पालक मुलांना कान्व्हेंटमध्ये घालतात. यामुळे मात्र, जिल्हा परिषद शाळांवर अवकळा आली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खासगी व नगरपालिकेच्या तेरा शाळा शेवटच्या घटका मोजत आहे.
सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून राज्यभरातील शिक्षण विभागाची अद्ययावत माहिती संग्रहीत करण्याची प्रक्रीया यू-डायसच्या माध्यमातून सुरू आहे. शैक्षणिक सत्र २०१४-१५ ची माहिती शिक्षण विभागाने संग्रहीत केली आहे. यात जिल्ह्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती प्राप्त झाली आहे. ही माहिती शिक्षण विभागासाठी धक्कादायक आहे. शाळांची पटसंख्या ३० असणे आवश्यक आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी शिक्षण विभाग शर्थीचे प्रयत्न करीत असले तरी, जिल्हा परिषद शाळांमध्ये पाल्यांना शिकविण्याचा पालकांचा कल नसल्याने या शाळांवर अवकळा पसरली आहे.
सन २०१३-१४ मध्ये जिल्ह्यात १० शाळा होत्या. त्यात केवळ २८ विद्यार्थी व २० शिक्षक होते. तर २०१४-१५ या चालू शैक्षणिक सत्रात शाळांची संख्या कमी होण्याऐवजी वाढून ती तेरावर पोहचली. या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ५३ असून शिक्षक ३१ आहेत. मागील वर्षी जिल्हा परिषदच्या आठ व अन्य दोन शाळांचा तर यावर्षी जिल्हा परिषदच्या दहा व अन्य तीन शाळांचा समावेश आहे. पटसंख्या कमी असली तरी, या शाळांवर शासनाने दोन शिक्षकांची नियुक्ती केली आहे. तर, दुसरीकडे जिल्ह्यात अनेक शाळांवर पटसंख्येपेक्षा जास्त विद्यार्थी असतानाही तिथे शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात आले आहे.
याकडे शिक्षण विभागाने लक्ष देऊन, २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना बंद करून तेथील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन केल्यास लाखोंचा खर्च वाचेल. जिल्ह्यातील तेरा शाळांमधील पटसंख्येचा विचार केल्यास अत्यंत दयनिय अवस्थेत जिल्हा परिषद शाळा असल्याचे निदर्शनात येते.
जिल्हा मुख्यालयात शिक्षणाचा ‘आयचा घो’
जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात मराठी शाळांची वाट लागली आहे. भंडारा पंचायत समितीत मागील वर्षी पटसंख्या चारपेक्षा कमी असलेल्या दोन शाळा होत्या. यावर्षी या शाळांची संख्या कमी होण्याऐवजी यात तब्बल चार शाळांची वाढ होऊन संख्या सहावर पोहचली आहे. शिक्षण विभागासाठी हा आत्मचिंतनाचा विषय आहे.
या आहेत ‘तेरा’ शाळा
भंडारा येथील नगरपालिकेची नेहरू विद्यालय, नर्मदा प्राथमिक शाळा, शासकीय अंध विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किटाळी, ठाणा, पेवधा. तुमसर तालुक्यातील सक्करदरा, साकोली येथील मक्कीटोला, लाखनी तालुक्यातील मानेगाव येथील एआयएम, पवनी तालुक्यातील चार शाळा ज्यात जिल्हा परिषद सोमनाळा (खु.), चुल्हाड, पन्नाशी व महालगाव या शाळांचा समावेश आहे.
पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे कल वाढला आहे. त्यामुळे पाल्याला कॉन्व्हेंटमध्ये शिकवितात. तसेच गावात भरतीस पात्र विद्यार्थ्यांची पुरेशी संख्या नसावी, त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे.
- स्वर्णलता घोडेस्वार
उपशिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद, भंडारा.