१२.५ लाख लोकांना मिळणार लाभ
By Admin | Updated: December 10, 2014 22:53 IST2014-12-10T22:53:31+5:302014-12-10T22:53:31+5:30
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग नियंत्रणासाठी एक दिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील १२ लाख ३२ हजार २९९

१२.५ लाख लोकांना मिळणार लाभ
भंडारा : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग नियंत्रणासाठी एक दिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील १२ लाख ३२ हजार २९९ नागरिकांना लाभ मिळणार आहे. यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने १ हजार ५१४ कर्मचारी व ७६ पर्यवेक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हत्तीरोग नियंत्रणासाठी शासनाने पाऊल उचलले आहे. याअनुशंगाने जिल्ह्यात १४ ते १८ डिसेंबरदरम्यान मोहिम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम दोन टप्प्यात राबविणार आहे. ग्रामीण भागात १४ ते १६ तर शहरी भागात १४ ते १८ डिसेंबर दरम्यान राबविणार आहे. या कालावधीत फक्त एकच दिवस डिईसी गोळ्या प्रत्यक्षरित्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दोन सदस्यीय पथकाकडून खाऊ घालण्यात येईल. या पथकामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका व अन्य स्वयंसेवकांचा समावेश राहणार आहे.
या मोहिमेत जिल्ह्यातील ७ तालुक्यामधील १२ लाख ७६ हजार ९२४ लोकसंख्येपैकी एक दिवसीय मोहिमेकरिता ग्रामीण भागात १० लाख ३८ हजार ८९२ आणि शहरी भागात १ लाख ९३ हजार ४०७ लोकसंख्या निवडण्यात आलेली आहे. या मोहिमेकरिता गोळ्या वाटप करण्यासाठी ग्रामीण भागात १ हजार ३८५ आणि शहरी भागात १२९ असे १ हजार ५१४ कर्मचारी मनुष्यबळ आणि ७६ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मोहिमेचा उद्देश समाजातील जंतूभार कमी करणे, हत्तीरोगापासून येणारी विकृती टाळणे, डासांमार्फत होणारा रोगाचा प्रसार टाळणे हाच आहे. रोगाच्या सुरूवातीच्या काळात म्हणजे बाह्य लक्षणे दिसल्याबरोबर जर औषधोपचार केला तर रोग बरा होतो. या मोहिमेत २ ते ५ वर्षावरील वयोगटातील बालकांना डिईसी गोळ्यांची एक दिवसीय मात्रा देण्यात येणार आहे.
तर ६ ते १४ वर्ष वयोगटातील बालकांना २ गोळ्या, १५ वर्षापेक्षा जास्त वयोगटासाठी ३ गोळ्या देण्यात येणार असून यासोबत १ गोळी अल्बेंडॅझोल देण्यात येणार आहे. या मोहिमेत फक्त २ वर्षाखालील बालके, गरोदर माता व गंभीर आजारी रूग्णांना वगळण्यात येणार आहे. (शहर प्रतिनिधी)