११० कोटी रुपयांची उलाढाल रखडणार!

By Admin | Updated: October 22, 2015 00:35 IST2015-10-22T00:35:09+5:302015-10-22T00:35:09+5:30

विजयादशमीसह सलग दोन सुटींमुळे जिल्ह्यातील बँका पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत.

110 crores turnover! | ११० कोटी रुपयांची उलाढाल रखडणार!

११० कोटी रुपयांची उलाढाल रखडणार!

बॅका तीन दिवस बंद : बाजारातील अर्थचक्रालाही फटका
इंद्रपाल कटकवार भंडारा
विजयादशमीसह सलग दोन सुटींमुळे जिल्ह्यातील बँका पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. परिणामी, भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, व्यापारी तथा क्षेत्रीय बँकांच्या १५४ शाखांमधील उलाढाल तीन दिवस ठप्प पडणार आहे. त्यामुळे या तीन दिवसात जिल्ह्यातील सुमारे ११० कोटींचे व्यवहार होणार नाहीत. सलग सुटींमुळे एटीएममध्येही ‘लक्ष्मींची’ चणचण भासणार आहे.
सण-उत्सव काळातच बँकांना सुटी असल्यामुळे बाजारातील अर्थचक्राला फटका बसणार आहे. आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिना हा सण-उत्सवाचा महिना म्हणून ओळखला जातो. या कालावधीत बँकांना सलग सुटी असते. यावर्षी या सलग सुटी नसल्या तरी गुरुवारी विजयादशमी असल्याने त्या दिवशी जिल्ह्यातील बँका बंद राहतील.
२३ आॅक्टोबरला बँका सुरू राहणार असल्या तरी २४ आॅक्टोबरला चौथा शनिवार आणि २५ ला रविवार आल्याने बँका बंद राहणार असल्याने सर्वसामान्यांची बँकिंगची कामे ठप्प पडणार आहेत.
जिल्ह्यातील १५४ शाखांपैकी १०७ बँका राष्ट्रीयकृत आहेत. सहकारी क्षेत्रातील बँका ४३ आहेत. शासकीय, निमशासकीय अन्य खाजगी क्षेत्रातून होणारा आर्थिक व्यवहार लक्षात घेतल्यास बँकांच्या उलाढालीचा आकडा उचावंत असतो.
सण-उत्सव काळात बाजारपेठेत मोठी उलाढाल होते; परंतु या सुटी आल्यामुळे बाजारपेठेतील अर्थचक्र प्रभावित होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणने आहे. नागरिकांची पूर्ण मदार एटीएमवर राहणार असल्याने एटीएम केंद्रांवर ताण येणार आहे.
परिणामी बँकांना एटीएममध्ये किमान दोनदा रोख रकमेचा भरणा करावा लागणार असल्याची शक्यता आहे. बँकांना सलग तीन दिवस सुटी आल्यास त्यातील एक दिवसाची सुटी ही समायोजित केली जाते. १८८१ च्या परक्राम्य लेखा अधिनियमानुसार ती समायोजित करतात. त्यामुळे बँकांना सलग तीन दिवस सुटी राहू शकत नाही. यावर्षी सुदैवाने दसऱ्यानंतर दुसऱ्या दिवशी बँका सुरू राहणार असल्याने सुटी समायोजित करण्याची गरज पडली नाही.

दिवसाकाठी ४० कोटींची उलाढाल
जिल्ह्यातील बँकांच्या एकूण १५४ शाखांमधून सामाण्यपणे दररोज ३५ ते ४० कोंटी रुपयांचे रोख व धनादेशाद्वारे व्यवहार होतात. बँका तीन दिवस बंद राहणार असल्याने तीन दिवसांचे ११० कोटी रुपयांची उलाढाल होणार नाही. त्यामुळे बाजारावर याचा काही प्रमाणात प्रभाव जाणवू शकतो. सोमवारी बँंकांचे कामकाज सुरू होताच ग्राहकांची झुबंड पाहायला मिळेल.
एटीएममध्येही भासणार चणचण
भंडारा जिल्ह्यात जवळपास सर्वच बँकांचे एटीएम आहेत. यात सर्वाधिक एटीएम स्टेट बँक आॅफ इंडियाचे ४० तर बँक आॅफ इंडियाचे ३६ एटीएम आहेत. अलाहाबाद बॅक़ ३, एक्सीस बँक ४, बँक आॅफ बडोदा १, बँक आॅफ महाराष्ट ४, कॅनरा बँक ५, सेंट्रल बँक आॅफ इंडिया ६, आयडीबीआय बँक ५, इंदियन ओव्हरसीज बँक ३, सिंडीकेट बँक १, युनियन बँक आॅफ इंडिया ६, विजया बँक १, एचडीएफसी ३, आयसीआयसीआय ६ तर कॉर्पोरेशन बँकेचे २ एटीएम कार्यरत आहेत. बीडीसीसी बँकेची एटीएम प्रणाली कार्यान्वित झालेली नाही.

सलग सुटी असली तरी शुक्रवारी कामकाज होईल. उलाढाल किती प्रमाणात होईल हे निश्चितपणे सांगता येत नसले तरी कामाच्या व्याप्तीवर लक्ष देण्यात येईल. ग्राहकांना त्रास होणार नाही यासाठी उपाययोजना करण्याची सुचना बँकांना देण्यात येईल.
- संजय पाठक, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, भंडारा.

Web Title: 110 crores turnover!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.