१८८ जागांसाठी १0 हजार ४८२ उमेदवार
By Admin | Updated: June 5, 2014 23:48 IST2014-06-05T23:48:56+5:302014-06-05T23:48:56+5:30
जिल्ह्यातील पोलीस शिपाई पदाची भरती उद्या दि. ६ जून पासून सुरु होत आहे. यासाठी जिल्हा भरासह अन्य जिल्ह्यातून १८८ पदांसाठी ऑनलाईन १0 हजार ४८२ उमेदवारांनी नोंदणी केली आहे.

१८८ जागांसाठी १0 हजार ४८२ उमेदवार
आजपासून पोलीस भरती : यंत्रणा सज्ज
भंडारा : जिल्ह्यातील पोलीस शिपाई पदाची भरती उद्या दि. ६ जून पासून सुरु होत आहे. यासाठी जिल्हा भरासह अन्य जिल्ह्यातून १८८ पदांसाठी ऑनलाईन १0 हजार ४८२ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या आशयाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कैलाश कणसे यांनी आज सायंकाळी पोलीस मुख्यालयात आयोजित वार्ताहर परिषदेत दिली.
अप्पर पोलीस महानिर्देशक यांच्या आदेशांतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीची कारवाई सुरु आहे. या अंतर्गत भंडारा जिल्ह्यातही पोलीस शिपाई भरती होत आहे. ही भरती १८८ जागांसाठी असून त्यात अनुकंपाधारकांनाही आरक्षित करण्यात आले आहे. तसेच १८८ पैकी ३0 टक्के जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत.
भरती प्रक्रिया जिल्हा मुख्यालयातील दोन ठिकाणी घेण्यात येणार आहे. यात पोलीस कवायत मैदान व चैतन्य क्रीडांगणात घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी मोठय़ा प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तथा पारदर्शतेसाठी सीसीटीव्ही कॅमेर्यांची सोय करण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थेत पाच उपविभागीय पोलीस अधिकारी, २१ पोलीस निरीक्षक तथा ३२0 पोलीस कर्मचारी पोलीस भरती प्रकियेत सहभागी करण्यात आली आहेत. पोलीस भरतीची व्हीडीओ रेकॉर्डींग करण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेच्या प्रसंगी कुठलेही तांत्रिक अडचण किंवा तक्रार प्राप्त झाल्यास या संदर्भात भरती प्रक्रिया मंडळाचा निर्णय अंतिम राहणार आहे. सकाळी ५ वाजतापासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असून दर दिवशी ५00 उमेदवारांना परीक्षेसाठी बोलाविण्यात येणार आहे. परीक्षेच्या ठिकाणी पाणी, कँटीन यांची व्यवस्था करण्यात आली आहे. जवानांची परीक्षा दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे.
पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार परीक्षास्थळी कुठलेही इलेक्ट्रॉनिक्स माध्यम बाळगू शकणार नाही. भरती प्रक्रिया पूर्णत: पारदर्शक व्हावी यासाठी प्रत्येक उमेदवाराच्या नातेवाईकांना परिसरात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच संबंधित अधिकार्यांनी भरती प्रक्रियेसंबंधी तंतोतंत मार्गदर्शन करण्यात आले असून वशिलेबाजी संदर्भात कुठलीही हयगय होता कामा नये असेही दिशानिर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान शहरात तरुणांचे जत्थे पोलीस भरतीसाठी दाखल झाले आहेत. (शहर प्रतिनिधी)