कोरोना योद्ध्यांसाठी खासगी रुग्णालयात १० टक्के खाटा आरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:36 IST2021-04-22T04:36:37+5:302021-04-22T04:36:37+5:30
कोरोनाची दुसरी लाट आली असून, दररोज हजाराच्या वर रुग्ण जिल्ह्यात निघत आहेत. शासकीय आणि खासगी रुग्णालयांत खाट मिळणे कठीण ...

कोरोना योद्ध्यांसाठी खासगी रुग्णालयात १० टक्के खाटा आरक्षित
कोरोनाची दुसरी लाट आली असून, दररोज हजाराच्या वर रुग्ण जिल्ह्यात निघत आहेत. शासकीय आणि खासगी रुग्णालयांत खाट मिळणे कठीण झाले आहे. अशा कठीण परिस्थितीत आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस, नगरपालिका प्रशासन आणि इतर विभागांतील अधिकारी-कर्मचारी कोरोना योद्धा म्हणून काम करीत आहेत. अशा परिस्थितीत हे कर्मचारीही कोरोनाबाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, रुग्णालय हाऊसफुल्ल असल्याने त्यांना वेळेवर उपचार आणि खाट मिळण्याची शक्यता कमी आहे. अशा स्थितीत आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या कोरोना योद्ध्यांसाठी आता जिल्ह्यातील २५ खासगी रुग्णालयांमध्ये १० टक्के खाटा राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
१० टक्के खाटा आरक्षित ठेवणे म्हणजे त्या खाटा पूर्णपणे रिकाम्या ठेवणे अपेक्षित नाही. जेव्हा एखादी खाट रिकामी होईल, तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून सूचना दिली जाईल. त्यावेळी सदर खाट कोविड योद्ध्याला किंवा शासनाशी सलग्न घटकाला उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश संबंधित रुग्णालयांना मंगळवारी निर्गमित करण्यात आले आहेत.
बाॅक्स
कोरोना योद्ध्यांचे मनोबल उंचवा
आपल्या जिवाची पर्वा न करता आरोग्य अधिकारी, कर्मचारी, महसूल विभाग, पोलीस, नगरपालिका कर्मचारी, पुरवठादार, स्वच्छता कामगार कोरोना काळात सेवा देत आहेत. या सर्वांचे मनोबल उंचावले राहील यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.