तुमची छोटीशी सकारात्मक कृती कोणाचे जग बदलू शकते, वाचा एका वारुळाची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 17:35 IST2022-03-09T17:34:56+5:302022-03-09T17:35:13+5:30

एखादी गोष्ट साध्य केल्यानंतर दुसऱ्यांचे भले करू हा विचार सोडा आणि आता जे शक्य आहे तेवढ्या भांडवलावर दुसऱ्यांची मदत करायला शिका, जशी या मुलाने केली!

Your little positive action can change someone's world, read this story! | तुमची छोटीशी सकारात्मक कृती कोणाचे जग बदलू शकते, वाचा एका वारुळाची गोष्ट!

तुमची छोटीशी सकारात्मक कृती कोणाचे जग बदलू शकते, वाचा एका वारुळाची गोष्ट!

महामारीचे हे भयंकर चित्र पाहून त्रस्त झालेला एक छोटासा मुलगा आईला म्हणाला, 'आई, हे आणखी किती काळ असेच सुरू राहणार आहे? मी जर मोठा वैज्ञानिक असतो, तर नक्कीच हे चित्र बदलून टाकले असते. सर्वांचे रक्षण केले असते. सगळ्यांना होणारा त्रास संपवून टाकला असता.'

आपल्या छोट्याशा मुलाचे संवेदनशील मन पाहून आईचे हृदय प्रेमाने भरून आले. ती म्हणाली, `बाळा, जगाप्रती आणि प्रत्येक जीवाप्रती अशीच कणव आयुष्यभर मनात असू दे. तुझ्या हातून घडलेली छोटीशी चांगली कृतीदेखील कोणाचे जग बदलू शकेल. त्यासाठी तुला वैज्ञानिक होईपर्यंत थांबण्याची गरज नाही. चांगले काम कधीही करता येते.'

आईचे शब्द मुलाच्या मनात घुमू लागले. चांगले काम करायचे म्हणजे नक्की काय करायचे, हे त्याला सुचले नाही. पण आईने निर्माण केलेला आशावाद त्याच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा होता.

एक दिवस नदीवर आंघोळीला जात असताना, अवकाळी पावसामुळे नदीचे पात्र भरू लागल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने नदीवर जाण्याचे टाळले. परंतु तिथून परतत असताना नदीच्या तीरावर एक वारुळ होते. त्या वारुळातून हजारो मुंग्या आतबाहेर करत होत्या. पाण्याची पातळी वाढली तर हे सुंदर वारुळ पाण्यात वाहून जाईल आणि हजारो मुंग्यांचे प्राण जातील. या विचाराने मुलाने त्या वारुळाचा परीसर मोठमोठ्या दगडांनी सुरक्षित केला. त्यामुळे नदीचे पाणी आपली सीमा ओलांडूनही त्या वारुळाला हानी पोहोचवू शकले नाही. 

नदीतील पाण्याची पातळी ओसरल्यावर मुलगा नदीवर आंघोळीला गेला. तेव्हा त्याला वारुळ सुरक्षित असल्याचे आढळले आणि त्यात असलेल्या हजारो मुंग्यांना पाहून त्याला खूपच आनंद झाला. तो लगबगीने घरी आला आणि आईला म्हणाला, `आई, तू म्हणाली होतीस ना? छोटीशी कृती कोणाचे जग बदलू शकते? माझ्या छोट्याशा कृतीने हजारो मुंग्यांचे प्राण वाचले. आजच्या महामारीच्या काळात वैज्ञानिक बनून मी हजारो लोकांचे प्राण वाचवू शकलो नाही, पण हजारो मुंग्यांना वाचवू शकलो याचा मला खूप आनंद आहे...!'

गोष्टीचे तात्पर्य हेच सांगते, की बदल छोट्या छोट्या गोष्टींमधून घडत असतात. परंतु, त्यासाठी बदल घडवण्याची संवेदनशीलता, तत्परता आणि मदतीचा भाव मनात असावा लागतो. आजच्या घडीला असा मदतीचा हात अनेकांना हवा आहे. तो पुढे करताना आपल्याला या लहान मुलाचा आदर्श नक्कीच ठेवता येईल. 

Web Title: Your little positive action can change someone's world, read this story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.