अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 01:58 IST2025-05-15T01:57:20+5:302025-05-15T01:58:32+5:30
Shree Swami Samarth Maharaj: संकट काळात निराश, उदास न होता, मनोभावे स्वामींना या प्रार्थनेतून आर्त साद घाला. अशक्यही शक्य करतील स्वामी, हा भाव मनात कायम ठेवा. श्री स्वामी समर्थ.

अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
Shree Swami Samarth Maharaj: श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भूत अनुभव येतो. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून, अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच, हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे. अनेकदा मन अशांत, अस्थिर असते. अनामिक भीती मनात दाटून येत असते. काय करावे, काहीच सूचत नाही, अशा वेळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आवर्जून हाक मारा आणि एक प्रार्थना अवश्य करा.
अक्कलकोट तर स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते. लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु, जेव्हा कृपा होते, शुभाशिर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. परंतु, रोजच्या धकाधकीच्या जीवनात बरे वाईट अनुभव येत असतात. मात्र, काही वेळेस अशा काही घटना घडतात, तेव्हा मन उद्विग्न होते. बेचैन व्हायला होते. अनेक दिवस अशाच अशांत मानसिकतेत जात असतात. आपण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतो, चाचपडत असतो. परंतु, केवळ अंधारच डोळ्यासमोर दिसत असतो. सगळे दिवस सारखे नसतात, सुख दुःखाचा ससेमिरा सुरूच राहतो. चांगले दिवस दाखवण्याआधी स्वामी परीक्षा घेतात. त्या संकट काळात न डगमगता एक प्रार्थना करावी. स्वामी नक्कीच बळ देतील.
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही?
मानसिक शांतता लाभत नाही. प्रयत्न करूनही मेहनतीचे फळ मिळत नाही. अशावेळी मनाची घालमेल अधिक वाढते. अनेकदा संकटे येत असतात. संकटाला सामोरे जाण्याची ताकद देवाकडे मागावी. अशा वेळेस एक प्रार्थना अवश्य करावी. रोजच्या उपासनेत समाविष्ट करावी. केवळ शब्द नाही तर त्यामागील भाव समजून उमजून म्हणावी. असे केल्यास मन स्थिर, शांत होण्यास मदत मिळू शकेल. विचारचक्र शमू शकेल. पूर्ण समर्पण भाव जागृत होऊ शकेल. स्वामींना प्रार्थनापूर्वक विनंती करा की,
सद्गुरू नाथा हात जोडितों अंत नको पाहू
उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू ।।
निशीदिनी श्रमसी मम् हितार्थ तू किती तुज शीण देऊ
हृदयी वससी परी नच दिससी कैसे तुज पाहू ॥
उत्तीर्ण नव्हे तुज उपकारा जरी तनु तुज वाहू
बोधुनि दाविसी इहपर नश्वर मणी उठला बाऊ ॥
कोण कुठील मी कवण कार्य मम जणी कैसा राहू
करी मज ऐसा निर्भय निश्चल सम सकला पाहू ॥
अजाण हतबल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू
निरसुनी माया दावी अनुभव प्रचीती नको पाहू ॥
‘हे’ अजिबात विसरू नका
स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे. स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा. स्वामी नक्कीच शुभ करतील, अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा. स्वामी महाराजांप्रति केवळ नम्र, शरणागत आणि समर्पण भाव ठेवा. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण, स्वामी सेवा करत राहा. गरिबाला मदत करणे, मोठ्यांचा मान राखणे, सेवा करणे, लहानग्यांना समजून घेणे, रागावर नियंत्रण ठेवणे, सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे, मुख्य म्हणजे माणुसकी जपणे. या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेस पात्र होतात, असे म्हटले जाते. कोणी कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागत असू तर आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून आहेत, आपले कार्य त्यांना समर्पित करावे. संकट काळात निराश, उदास न होता, मनोभावे स्वामींना या प्रार्थनेतून आर्त साद घाला, स्वामी निश्चित मदत करतील अन् अशक्यही शक्य करतील, असा दृढ विश्वास मनात कामय ठेवा.
॥ श्री स्वामी समर्थ ॥