पन्नाशीनंतर वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मनुष्याची शांती का केली जाते? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 13:02 IST2022-01-15T13:01:30+5:302022-01-15T13:02:20+5:30
पन्नास ते शंभर वर्षांपर्यतच्या कालावधीत दर पाच वर्षांनी एक, अशी या शांतीची आखणी केली आहे. ही शांती करण्याचे महत्त्व जाणून घ्या.

पन्नाशीनंतर वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मनुष्याची शांती का केली जाते? जाणून घ्या!
साठीशांत, हा शब्द बहुतेकांच्या परिचयाचा आहे. अशाच स्वरूपाच्या वेगवेगळ्या शांती पन्नाशीनंतर कराव्यात, असे शास्त्राने सांगून ठेवलेले आहे. शांती करणे हा एक आचार आहे.
अथर्ववेदातील तिसऱ्या कांडातील काही मंत्रांचा भावार्थ असा सांगितला आहे, की होम हवनामुळे रोग व्याधी यांचा नाश होतो, दु:खाचा नाश होतो. ऐश्वर्यप्राप्ती होते, दीर्घायुष्याचा लाभ होतो आणि मुख्य म्हणजे शांतीचाही लाभ होतो.
हे सगळे फायदे आपल्याला मिळावेत असे कुणाला वाटणार नाही? जन्मापासून ते वयाच्या वीस पंचवीस वर्षांपर्यंत स्त्री पुरुषांचा काळ बाल्यावस्था व नंतर शिक्षण यामध्ये जात असतो. विशी पंचविशीचे सुमारास शिक्षण संपवून तो अर्थार्जन करू लागतो आणि विवाहबद्ध होतो. तेव्हापासून ते पन्नास वर्षाचा होईपर्यंत त्याचा काळ हा स्थूलमानाने चढत्या क्रमाने कर्तृत्वाचा असतो आणि पन्नाशीला सर्वसाधारणपणे त्याचा संसार पूर्ण होऊन त्याच्या जीवनाची वाटचाल उतरत्या दिशेकडे सुरू होत असते.
उतरत्या दिशेकडे झुकू लागण्याच्या त्याच्या या वयापासून आपल्या शास्त्रकारांनी वेगवेगळ्या शांती सांगितलेल्या आहेत. पन्नास ते शंभर वर्षांपर्यटच्या कालावधीत दर पाच वर्षांनी एक, अशी या शांतीची आखणी केली आहे. त्याला वेगवेगळी नावेदेखील आहे. त्याबद्दल सविस्तर चर्चा पुन्हा कधी तरी...शांतीचे प्रयोजन समजून घेणे हा या लेखामागील हेतू आहे.
मानवी जीवनात संकटे, अरिष्टे कुणाला येत नाहीत? देव देवताही यापासून दूर राहू शकल्या नाहीत, मग मानवाची काय कथा? दुष्ट ग्रह, आरोग्य बिघडणे, दुष्काळ, साथीचे रोग, किडीचा उपद्रव, वाईट स्वप्न पडणे, धन जाणे वगैरे प्रकारच्या अनेक अरिष्टांना माणसाला तोंड द्यावे लागते. परंतु या संकटांशी माणूस मुकाबला करीत असताना त्याला दैवी पाठबळ मिळाले, तर त्याला उत्तम गती मिळते, हा शांतीमागील प्रधान हेतू आहे.
(माहिती स्रोत : लेखक गजानन खोले यांच्या कुळधर्म कुळाचार कुलदैवत पुस्तकातून साभार)