Why do they fast twice on Ekadashi? Read the scientific reason behind it! | एकादशीला दोन वेळचा उपास का करतात? वाचा त्यामागील शास्त्रीय कारण!

एकादशीला दोन वेळचा उपास का करतात? वाचा त्यामागील शास्त्रीय कारण!

एकादशी ही तिथी महिन्यातून दोनदा येते. पौर्णिमेआधी चार दिवस आणि अमावस्येआधी चार दिवस. या दोन्ही दिवशी भरती ओहोटीच्या दृष्टीने भूगर्भात अनेक हालचाली घडत असतात. आपल्या शरीराचा ७५ टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. त्यामुळे निसर्गातील घटनांचा मानवी शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. म्हणून दोन्हीचा ताळमेळ सुयोग्य पद्धतीने साधायचा असेल, तर त्यासाठी शरीराला निसर्गाशी जुळवून घेणे प्राप्त ठरते. यासाठी आपल्या पूर्वजांनी एकादशीचा उपास सांगितला आहे.

आयुर्वेदात उपासाच्या प्रक्रियेला लंघन असे म्हणतात. लंघन अर्थात अन्न व्यर्ज्य करणे. आपला देह हे एक यंत्र आहे. यंत्राला नियमित डागडुजी करावी लागते, अन्यथा ते कधीही बंद पडते. शरीररूपी यंत्राची डागडुजी म्हणजे नियमित आहार, व्यायाम आणि झोप. यंत्र सतत वापरात असेल, तरीही ते काम करणे बंद करते. त्यामुळे त्याला सक्तीची विश्रांती द्यावी लागते. शरीराला सुद्धा लंघनाच्या रूपाने एक दिवस सक्तीची विश्रांती आवश्यक असते.

आपल्या आहारपद्धतीत झालेले बदल पाहता आपले शरीर रोगांचे माहेरघर झाले आहे. पूर्वी साठी ओलांडलेल्या लोकांमध्ये मधुमेह, हृदयविकार ही लक्षणे आढळून येत. ती लक्षणे आता वीस-तीसच्या उंबरठ्यावर दिसू लागतात. चाळीशीची खूण समजला जाणारा चष्मा दोन ते चार वर्षांच्या मुलांनीही लावलेला दिसून येतो. वाढते ताणतणाव, दुर्मिळ आजार, रोगप्रतिकारक्षमतेची कमतरता, या सर्व बाबींना कारणीभूत आहे ती म्हणजे चुकीची आहारपद्धती. 

आपण अन्नग्रहण करतो परंतु ते पचण्यासाठी पुरेसा अवधी देत नाही. एक अन्न पचत नाही, तोवर दुसरे अन्न ग्रहण करतो. ही प्रक्रीया सतत सुरू राहिल्यामुळे शरीराची यंत्रणा बिघडते. यासाठी पंधरा दिवसांनी एकदा एकादशीचा उपास करावा. उपास शक्यतो काहीही न खाता करावा. गरज लागली, तर फलाहार करावा. मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी या उक्तीप्रमाणे फराळ केला जाणार असेल, तर एकादशीचा उपास न केलेला बरा.

एकादशीचा उपास दोन्ही वेळ केला जातो. म्हणजेच पूर्ण दिवस लंघन करून शरीर शुद्धी प्रक्रिया केली जाते. अशा वेळी सतत आहाराकडे झेपावणाऱ्या मनाला नियंत्रित करण्यासाठी ईशचिंतनाकडे वळवले जाते. म्हणूनच या शास्त्रीय कारणाला धार्मिकतेची जोड देऊन एकादशी या तिथीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. 

अध्यात्मिक दृष्ट्या उपवास करणे या शब्दाचा अर्थ आहे अधिक जवळ जाणे. कोणाच्या? तर भगवंताच्या. आपल्या रामरगाड्यात काही क्षण उपवास करावा. देवासाठी नाही, तर स्वत:साठी. मन:शांती साठी. आजवर एकादशीचे ब्रीद पाळलेल्या अनेक भाविकांनी या व्रताची अनुभूती घेतलेली आहे. आपल्यालाही तो अनुभव घ्यायचा असेल, तर एकादशी व्रताचे अवश्य पालन केले पाहिजे. 

Web Title: Why do they fast twice on Ekadashi? Read the scientific reason behind it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.