७ मुखी रुद्राक्ष कोणी धारण करावा? लक्ष्मी-शनि अखंडित कृपा, ‘हे’ मंत्र अवश्य म्हणा; शुभ-लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 13:05 IST2025-02-10T13:02:24+5:302025-02-10T13:05:54+5:30
7 Mukhi Rudraksha Benefits In Marathi: ७ मुखी रुद्राक्ष धारण करण्याचे लाभ, महत्त्व आणि काही मान्यता जाणून घ्या...

७ मुखी रुद्राक्ष कोणी धारण करावा? लक्ष्मी-शनि अखंडित कृपा, ‘हे’ मंत्र अवश्य म्हणा; शुभ-लाभ!
7 Mukhi Rudraksha Benefits In Marathi: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अनेक गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व आहे आणि त्याचे महात्म्यही तेवढेच आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेक गोष्टी करत असतो. अनेकदा प्रयत्न, मेहनत, परिश्रम घेऊनही म्हणावे तसे यश मिळतेच असे नाही. प्रगतीची संधी मिळतेच असे नाही. मग त्यासाठी काही उपाय केले जातात. केवळ यश-प्रगती, सुख-समृद्धीसाठी नाही, तर आराध्य देवतेचे, कुलदेवतेचे शुभाशिर्वाद लाभावे, भक्कम पाठबळ लाभावे, यासाठीही अनेक गोष्टी केल्या जातात. महादेव शिवशंकर यांच्या प्रतिकांपैकी एक असलेले रुद्राक्ष अतिशय पवित्र, शुभ-लाभदायक, पुण्य फलदायी मानले जाते. परंतु ते योग्य पद्धतीनेच धारण करावे, असे सांगितले जाते. अनेक मुखी रुद्राक्ष असतात. त्यापैकी ७ मुखी रुद्राक्षाबाबत काही माहिती आणि मान्यता जाणून घेऊया...
भारतीय परंपरांमध्ये रुद्राक्षाचे विशेष महत्त्व आहे. रुद्राक्षाची उत्पत्ती भोलेनाथांच्या अश्रूंपासून झाली, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. प्रत्येक रुद्राक्षात भगवान शिव वास करतात, असे म्हटले जाते. रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळते. शास्त्रांमध्ये १६ मुखी रुद्राक्षांचा उल्लेख आहे. काही रुद्राक्ष काळानुसार लुप्त झाल्याचे सांगितले जाते. असे मानले जाते की, ७ मुखी रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीच्या पैशांशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते, असे म्हटले जाते.
७ मुखी रुद्राक्ष कसे असते?
रुद्राक्षाचा वृक्ष असतो. रुद्राक्षाचे बीज किंवा फळे त्या झाडाला लागतात. इंडोनेशिया आणि नेपाळ या देशांमधील रुद्राक्ष सर्वोत्तम मानले जातात. भारतातही अनेक ठिकाणी रुद्राक्षाचे वृक्ष आढळून येतात. रुद्राक्षाच्या फळाला असलेल्या मुखांवरून तो रुद्राक्ष किती मुखी आहे, ते समजते. एकदा ते तंत्र आत्मसाद केले, तर कुणीही किती मुखी रुद्राक्ष आहे, ते ओळखू शकतो. सप्तमुखी रुद्राक्ष शनि ग्रहाच्या प्रभावाखाली असल्याचे मानले जाते. ७ मुखी रुद्राक्ष सूर्य, सप्तर्षि, कार्तिकेय, अनंग, म्हणजेच कामदेव, अनंत आणि नागराज आणि सात मातृकांना समर्पित असल्याचे म्हटले जाते.
७ मुखी रुद्राक्ष धारण करण्याचे शुभ-लाभ कोणते?
७ मुखी रुद्राक्ष धारण केल्याने करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असते. अशा व्यक्तींवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच राहतो. ७ मुखी रुद्राक्ष शनि ग्रहाशी संबंधित मानले जाते. म्हणून, ज्या लोकांना शनि साडेसाती आणि ढिय्या प्रभाव सुरू आहे, त्यांनी ७ मुखी रुद्राक्ष धारण करावा. ज्यांच्या कुंडलीत शनि स्थान किंवा स्थिती नकारात्मक आहे, ते ७ मुखी रुद्राक्ष धारण करू शकतात. विशेष म्हणजे योग्य सल्ल्यानुसारच कोणताही रुद्राक्ष धारण करावा.
७ मुखी रुद्राक्ष कसा धारण करावा?
महाशिवरात्रीला, प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला किंवा सोमवारी किंवा श्रावण महिन्यात रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले जाते. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात पंचामृत मिसळावे. नंतर या मिश्रणात रुद्राक्ष घालावा. यानंतर, १०८ वेळा ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि रुद्राक्ष धारण करावे. ही सोपी पद्धत झाली. परंतु, तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेऊनच रुद्राक्ष धारण करावा. काही लोकांना विशिष्ट पद्धतीनेच, विशिष्ट वेळीच रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला काही वेळा दिला जातो.
७ मुखी रुद्राक्षाचे अत्यंत प्रभावी मंत्र
७ मुखी रुद्राक्ष धारण करताना किंवा केल्यावर काही मंत्रांचा जप करणे अतिशय शुभ, पुण्याचे मानले जाते. हे मंत्र अतिशय प्रभावी असल्याचेही म्हटले जाते.
शिवपुराणानुसार ॐ हम नम: चा जप करा.
पद्मपुराणानुसार ॐ ह्रः चा जप करा.
स्कंद पुराणानुसार ॐ ह्रीम नम: चा जप करा.
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्।।
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.