Shravan Angarki Sankashti Chaturthi 2025: मराठी वर्षातील महत्त्वाचा मानला गेलेला चातुर्मास काळ सुरू आहे आणि चातुर्मासात अनन्य साधारण महत्त्व असलेला श्रावण महिन्याचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे. श्रावण पौर्णिमेनंतर संकष्ट चतुर्थीचे व्रत आहे. यंदाच्या श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे वैशिष्ट्य म्हणजे ही संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली असून, अतिशय शुभ मानला गेलेला अंगारक योग जुळून आलेला आहे. संकष्टी चतुर्थीचा अंगारक योग म्हणजे नेमके काय? संकष्ट चतुर्थी अंगारक योगाचे महात्म्या, वैशिष्ट्य आणि मान्यता जाणून घेऊया...
गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. गणपतीची शाश्वत कृपा लाभण्यासाठी मोठ्या प्रमाणात संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. णेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की तिला ‘अंगारकी’ म्हणण्याची प्रथा आहे.
अंगारक योग म्हणजे काय?
चतुर्थी तिथी मंगळवारी आली की, तिला ‘अंगारक योग’ असलेली चतुर्थी मानतात. श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी अतिशय महत्त्वाची मानली जाते. अंगारक म्हणजे मंगळ. या दिवशी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी ही विशेष पुण्यप्रद मानली जाते. अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले, तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते, शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. बाप्पा मंगलमूर्ती आहे. अंगारकीचा उपवास केल्यानंतर बारा संकष्टया केल्याचे पुण्य मिळते, अशी काही भाविकांची समजूत आहे, तर अंगारक चतुर्थी ही वीस संकष्ट चतुर्थ्या केल्याचे पुण्य देते, असेही काहींचे मानणे आहे. म्हणूनच हा उपवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. हजारो भाविक या दिवशी आवर्जून मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतात.
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५
अंगारकी संकष्टी चतुर्थी प्रारंभ: मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ०८ वाजून ४० मिनिटे.
संकष्ट चतुर्थी अंगारक योग समाप्त: बुधवार, १३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ०६ वाजून ३६ मिनिटे.
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली तरी संकष्ट चतुर्थीचे व्रत प्रदोष काळी चंद्रोदय झाल्यावर केले जात असल्याने मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५ रोजी व्रताचरण करावे, असे सांगितले जात आहे.
अंगारक संकष्ट चतुर्थी मान्यता
अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते, अशी मान्यता आहे. गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला. तेव्हापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. संकष्ट चतुर्थीचे व्रत ईच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते. मनोभावे हे व्रत केले असता, गणरायाची कृपादृष्टी लाभून ईच्छापूर्ती होते, असा भाविकांचा अनुभव आहे.
अंगारक संकष्ट चतुर्थी व्रतकथा
अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी संकष्टी चतुर्थी आली की, अंगारक योग जुळून येतो. याबाबत मुद्गल पुराणात एक कथा सांगितली जाते. तसेच गणेश पुराणातही याबाबत संदर्भ आढळून येतात, असे सांगितले जाते. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेशमंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला, की 'माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी कृष्ण पक्षातील चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल! अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते. मंगळाची धास्ती न बाळगता आपलेही जीवन मंगलमय व्हावे अशी प्रार्थना या अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने करता येईल.
अंगारक संकष्ट चतुर्थीला ही गोष्ट आवर्जून कराच
संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय, चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले गेले आहे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी. अनेकदा मनात असूनही अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपती पूजन करणे शक्य होत नाही. असे असले तरी गणरायाला एक दुर्वा अवश्य अर्पण करावी. मनोभावे गणपती बाप्पाचे स्मरण, नामस्मरण करावे. असे केल्याने पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तसेच गणपती अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे. आवर्तन करणे शक्य नसल्यास एकदा पठण करावे. गणपती अथर्वशीर्ष येत नसल्यास मनोभावे श्रवण करावे. अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा, असे सांगितले जाते.
॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥