मंदिरात देवदर्शन घेऊन झाल्यावर काही क्षण डोळे मिटून बसल्याने कोणते फायदे होतात? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 16:40 IST2022-05-05T16:40:22+5:302022-05-05T16:40:43+5:30
मंदिरात गेल्यावर काही गोष्टी आपण पाळतो. ते केवळ शास्त्र म्हणून नाही, तर त्यामुळे होणारे फायदे अनुभवता यावेत, म्हणून! कोणते आहेत ते फायदे, जाणून घेऊ.

मंदिरात देवदर्शन घेऊन झाल्यावर काही क्षण डोळे मिटून बसल्याने कोणते फायदे होतात? वाचा!
मंदिरात गेल्यावर एक वेगळीच सकारात्मकता आपल्याला भारावून टाकते. चपला बाहेर ठेवून, पाय धुवून मंदिर परिसरात प्रवेश केल्यावर बाह्य जगाशी नाते तुटते आणि अध्यात्मिक जगाशी नाते जुळते. फक्त अशा वातावरणात ईश्वर चिंतन मनात ठेवावे. अन्य विषय मनात डोकावू नये याकरिता मोबाईल बंद ठेवावा आणि देवाशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करावा. यासाठीच मंदिरात गेल्यावर काही गोष्टी आपण पाळतो. ते केवळ शास्त्र म्हणून नाही, तर त्यामुळे होणारे फायदे अनुभवता यावेत, म्हणून! कोणते आहेत ते फायदे, जाणून घेऊ.
ज्या देवाच्या दर्शनासाठी आपण रांग लावून शिस्तबद्ध पणे देवाचे दर्शन घेतो, ते दर्शन घेताना 'देवाचिये द्वारी उभा क्षणभरी' अशी आपली अवस्था होते. कारण, मागे गर्दीमुळे आपल्याला क्षणभरच दर्शन मिळते. त्या क्षणात आपण देवाचे दर्शन घेतो आणि लगेच डोळे मिटतो. कारण, आपल्याही नकळत आपल्या मनात भगवंताची असलेली प्रतिमा आणि डोळ्यासमोर दिसणारी प्रतिमा यांची तुलना होते. ते रूप मनात साठवून, इतरांची अडचण होऊ न देता, गाभाऱ्याच्या परिसरात गर्दी न करता, सभामंडपात येऊन तिथल्या ओट्यावर बसून ध्यान करतो. त्यावेळेस पुढील श्लोक म्हणावयाचा असतो,
अनासायेन मरणम, विना दैन्येन जीवनम
देहान्ते तव सान्निध्यम, देही मे परमेश्वरम
अनासायेन मरणम, मला कोणत्याही प्रकारचा त्रास न होता मरण दे, विना दैन्येन जीवनम, मला परावलंबी जीवन नको देऊ, देहान्ते तव सान्निध्यम, ज्या वेळी माझा प्राण निघेल त्यावेळी तुझे दर्शन दे, देही मे परमेश्वरम, हे परमेश्वरा मला या वरील गोष्टी दे, ही मागणी करावी.
देह हे देखील देवाचे मंदिर आहे. म्हणून ज्यापरामाणे मंदिरात गेल्यावर आपण क्षणभर विश्रांती घेतो, तशी आत्मचिंतनाच्या दृष्टीने आपल्या मनाच्या कट्ट्यावर देखील ध्यान धारणेच्या निमित्ताने विश्रांती घ्यावी आणि आत्मारामाचे चिंतन, स्मरण करावे. त्याला साद घालावी आणि मनोभावे प्रार्थना करावी.