Vishwakarma Jayanti 2023: व्यवसायात भरभराट व्हावी म्हणून विश्वकर्मा जयंतीला कोणते सिद्धमंत्र म्हणावेत, जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 15:29 IST2023-02-01T15:26:34+5:302023-02-01T15:29:07+5:30
Vishwakarma Jayanti 2023 : ३ फेब्रुवारी विश्वकर्मा जयंती, या विश्वाचे स्थापत्यकार विश्वकर्मा यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस!

Vishwakarma Jayanti 2023: व्यवसायात भरभराट व्हावी म्हणून विश्वकर्मा जयंतीला कोणते सिद्धमंत्र म्हणावेत, जाणून घ्या!
पृथ्वी कोणी निर्माण केली? या सृष्टीचा रचेता कोण? सर्व जीवांचा जन्मदाता कोण? अशा अनेक गोष्टींबद्दल आपल्याला उत्सुकता असते. त्यादृष्टीने वैज्ञानिक शोध सुरू आहेतच. मात्र त्याच्याही दोन पावले पुढे असलेले अध्यात्म या सर्व प्रश्नांची सोदाहरण उत्तरे देते. त्यासंदर्भात पुराण, वेद, वाङमय याचाही आपल्याला आधार घेता येतो. या सर्व चर्चेमागचे कारण हेच की ३ फेब्रुवारी रोजी विश्वकर्मा जयंती आहे. ज्यांनी ही पृथ्वी वसवली त्या स्थापत्यकार भगवान विश्वकर्मा यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
भगवान विश्वकर्मा हे या सृष्टीचे पहिले स्थापत्यकार मानले जातात. चारही युगांमध्ये त्यांनी निर्मित केलेल्या वास्तूंचे दाखले आहेत. त्यांनी कृष्णाची द्वारका, पांडवांची मयसभा, देवी देवतांसाठी आलिशान महाल, स्वर्गलोक, लंका, हस्तिनापूर, इंद्रपुरी, जगन्नाथ पुरी वसवली. जगन्नाथ पुरी येथील जगन्नाथाच्या मंदिरातील कृष्ण, सुभद्रा आणि बलरामाची मूर्ती त्यांनीच निर्माण केली आहे. तसेच भगवान शंकरासाठी त्रिशूळ, भगवान विष्णूंसाठी कवच कुंडल, महारथी कर्ण साठी कवच कुंडलांची निर्मिती त्यांनीच केली होती. त्यांची वैज्ञानिक आणि स्थापत्य शास्त्रातील दूरदृष्टी पाहून त्यांना ऋग्वेदात स्थान दिले आहे. त्यांची कारागिरी पाहून त्यांना वास्तूदेवाचे सुपुत्र असेही म्हटले जाते.
माघे शुक्ले त्रयोदश्यां दिवापुष्पे पुनर्वसौ।
अष्टा र्विशति में जातो विशवकर्मा भवनि च॥
धर्मशास्त्रानुसार माघ शुक्ल त्रयोदशीला भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी केली जाते. यादिवशी भगवान विश्वकर्मा यांची पूजा केली जाते. मुख्यत्वे व्यापारी वर्गात अतिशय आस्थेने विश्वकर्मा जयंतीचा दिवस साजरा केला जातो. तसेच त्यांच्या आशीर्वादाने काम व्हावे, यासाठी कार्यालयात विश्वकर्मा यांची तसबीरही आढळते. विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी या प्रतिमेचे सामूहिकपणे साग्रसंगीत पूजन केले जाते. यादिवशी अवजारांची, शस्त्रांची पूजा केली जाते. अभिषेक घातला जातो आणि भक्तिभावे विश्वकर्मा यांचा आशीर्वाद घेतला जातो.
आपण व्यापारी असो अथवा नसो, या सुंदर सृष्टीच्या रचेत्याप्रती कृतद्न्यता व्यक्त करण्यासाठी आपणही भगवान विश्वकर्मा यांची मनोभावे पूजा करूया. पूजा विधी नेहमीचाच आहे. फक्त त्याला काही मंत्रांची जोड द्यावी. जसे की, ॐ आधार शक्तपे नमः , ॐ कूमयि नमः, ॐ अनंतम नमः, ॐ पृथिव्यै नमः। या मंत्रांचे उच्चारण करून मनःपूर्वक नमस्कार करावा आणि या सृष्टीचे त्यांनी सदैव पालन आणि रक्षण करावे, म्हणून प्रार्थना करावी.
भगवान विश्वकर्मा की जय।।