Valentines Day 2024: कोणी आपल्यावर प्रेम करावं असं वाटत असेल, तर आधी स्वतःवर प्रेम करायला शिका!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 01:20 PM2024-02-10T13:20:31+5:302024-02-10T13:20:58+5:30

Valentines Day 2024: मोटिव्हेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी एका गोष्टीतुन देत आहेत प्रेम जीवनाचा संदेश; व्हॅलेंटाईनच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने ही गोष्ट जरूर वाचा. 

Valentines Day 2024: If you want someone to love you, learn to love yourself first! | Valentines Day 2024: कोणी आपल्यावर प्रेम करावं असं वाटत असेल, तर आधी स्वतःवर प्रेम करायला शिका!

Valentines Day 2024: कोणी आपल्यावर प्रेम करावं असं वाटत असेल, तर आधी स्वतःवर प्रेम करायला शिका!

'जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला' हे सुपरिचित गाणे आपण सर्वांनीच ऐकले असेल. ही लोकप्रियता मिळवण्यासाठी काय करावे लागेल, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर प्रसिद्ध वक्ते संदीप महेश्वरी एका गोष्टीतून आपल्याला सांगतात, `आधी स्वत:वर प्रेम करायला शिका. जोवर तुमची ओंजळ प्रेमाने भरलेली नसेल, तोवर तुम्ही दुसऱ्याच्या पदरात प्रेमाचे दान टाकू शकत नाही.' 

एकदा एक मुलगा आपल्या बाबांकडे हट्ट करतो, मी सुद्धा तुमच्याबरोबर कामाला येणार. वडील म्हणाले, मी जातो ती वाट फार कठीण आहे. एक उंच डोंगर पार करून कामावर जावे लागते. एवढे समजवूनही मुलाने येण्याचा हट्ट सोडला नाही. वडील त्याला घेऊन निघाले. डोंगर चढता चढता मुलाला धाप लागत होती. पण सभोवतालचा परिसर पाहून मजाही वाटत होती. वर वर जाताना दमछाक होऊ लागली. अशातच तो अनावधानाने एका मोठ्या दगडावर आदळला. त्याच्या तोंडून आर्त हाक आली....आह..!

त्या आवाजाचा प्रतिध्वनी उमटला, तसा मुलाने सभोवताली पाहिले. वडील पुष्कळ वर होते. मग आपली नकल कोणी केली? या विचारात तो ओरडला, कोण आहेस तू? पुन्हा तसाच आवाज. वडिलांनी मागे वळून पाहिले. मुलासाठी हा अनुभव नवीन असल्याने त्यांनी मागे येऊन मुलाला सावरले आणि त्याची गंमत करण्यासाठी मोठ्याने म्हणाले, `माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे....'

मुलगा वडिलांना बिलगला, त्याचवेळेस त्याचे कुतुहलही वाढले. वडिलांनी पुन्हा म्हटले, तू खूप गोड मुलगा आहेस. निसर्गाकडून असे कौतुकाचे बोल ऐकून मुलगा सुखावला आणि वडिलांना म्हणाला, हे नक्की काय होतंय?

त्यावर वडील म्हणाले, `बेटा तू छान आहेस, हे तुला पटलेले असेल तर जगाकडूनही तुझी वाहवा होईल, पण तू स्वत:ला वाईट ठरवलेस तर लोकही तुझी चेष्ठाच करतील. ही मोठी शिकवण या निसर्गाकडून मिळते. आपला ध्वनी हाच प्रतिध्वनी स्वरूपात ऐकू येत असतो. म्हणून आत्मविश्वासाने जगाला सामोरे जाऊन म्हण, `मी खूप खुष आहे, समाधानी आहे, माझं सर्वांवर प्रेम आहे.' मग बघ जग तुला काय सांगेल!'

मित्रांनो आपण सर्वात आधी आपली मानसिकता बदलली पाहिजे. सुधारणा स्वत: मध्ये केल्या पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण आपली हाक ऐकली पाहिजे, स्वत:वर प्रेम केले पाहिजे. जेणेकरून जगाने आपली साथ सोडली, तरी तुम्हाला एकटेपणा जाणवता कामा नये. म्हणून प्रेम करण्याची सुरुवात स्वत:पासून करा. आपोआपच तुम्ही जगावर प्रेम करू लागाल. 

Web Title: Valentines Day 2024: If you want someone to love you, learn to love yourself first!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.