सोमवती अमावास्याला शनि जयंती योग: ‘असे’ करा शिव-शनि पूजन, मिळेल सुख-समृद्धी, पुण्य लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 15:29 IST2025-05-25T15:24:48+5:302025-05-25T15:29:00+5:30

Vaishakh Somvati Amavasya 2025 And Shani Jayanti 2025: सोमवती अमावास्येला महादेव शिवशंकराचे पूजन करणे पुण्यफलदायी मानले जाते. या दिवशी शनैश्चर जयंती असल्यामुळे शनि उपासना करणेही अत्यंत लाभदायी मानले गेले आहे.

vaishakh somvati amavasya 2025 and shani jayanti 2025 know about shiv shani pujan vidhi and significance in marathi | सोमवती अमावास्याला शनि जयंती योग: ‘असे’ करा शिव-शनि पूजन, मिळेल सुख-समृद्धी, पुण्य लाभ!

सोमवती अमावास्याला शनि जयंती योग: ‘असे’ करा शिव-शनि पूजन, मिळेल सुख-समृद्धी, पुण्य लाभ!

Vaishakh Somvati Amavasya 2025 And Shani Jayanti 2025: यंदा २०२५ मध्ये सोमवार, २६ मे रोजी शनैश्चर जयंती आहे. याच दिवशी वैशाख सोमवती अमावास्येचे व्रतही केले जाणार आहे. वैशाख अमावास्येला शनैश्चर जयंती असते. शनि हा नवग्रहांमधील एक अतिशय महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनि महादेव शिवशंकर यांना गुरु मानतो. शनि जयंती सोमवारी येत असून, या दिवशी सोमवती अमावास्येचे व्रताचरण केले जाणार आहे. त्यामुळे शनि जयंतीच्या दिवशी केलेले शिवपूजन विशेष फलदायी आणि लाभदायी मानले गेले आहे. सोमवती अमावास्या आणि शनि जयंतीच्या सुवर्ण योगाला कसे पूजन करावे? जाणून घेऊया...

अमावास्या तिथी सोमवारी सुरू होत असल्यामुळे या अमावास्येला सोमवती अमावास्या, असे म्हटले जाते. सोमवती अमावास्येला महादेव शिवशंकराची उपासना करणे लाभदायक असते, अशी मान्यता आहे. धर्म शास्त्रात सोमवती अमावास्येचे महत्त्व सांगण्यात विशेषत्वाने विषद करण्यात आले आहे.  सोमवती अमावास्येला सूर्य आणि चंद्र ग्रह सरळ रेषेत असतात, असे सांगितले जाते. या दिवशी काही जण विशेष व्रत करतात. या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना, व्रत करतात. सोमवार हा महादेव शिवशंकराच्या पूजनासाठी विशेष मानला जातो. सोमवती अमावास्येला शंकराचे नामस्मरण, पूजन, भजन करण्याने विशेष पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. 

सोमवती अमावास्येला आवर्जून करा शिवपूजन

या दिवशी भगवान शंकरासोबत देवी पार्वतीची पूजा केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी योग्य प्रकारे पूजा केल्याने सुख, शांती आणि समृद्धी मिळते. शक्य असल्यास सकाळी महादेवाच्या मंदिरात जाऊन जलाभिषेक, रुद्राभिषेक करावा. पंचोपचाराने महादेवांचे पूजन करावे. यानंतर धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. त्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानले जाते. तसेच या दिवशी महादेवांचा सर्वाधिक प्रभावी महामृत्यूंजय मंत्राचे १०८ वेळा पठण करणे लाभदायक मानले गेले आहे. 

सोमवती अमावास्येला शनि जयंतीचा विशेष योग

शनैश्चर जयंतीला आवर्जून शनि मंदिरात जावे आणि दर्शन घ्यावे. या वेळेस शनी महाराजांना काळे तीळ, तेल अर्पण करावेत. शनि जयंतीला पिंपळाच्या झाडाशी जल अर्पण करून दिवा दाखवावा. शनि जयंतीला शनि संबंधित वस्तू काळे वस्त्र, काळे तीळ, मोहरीचे तेल यांचे दान करावे. हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचे पठण करावे. शनि देवाचे मंत्र, श्लोक, स्तोत्रे पठण करणे अतिशय शुभ मानले जाते. 

साडेसाती, शनि ढिय्या प्रभाव, शनि महादशा सुरू आहे? ‘हे’ कराच

आताच्या घडीला कुंभ, मीन आणि मेष राशीची साडेसाती सुरू आहे. तर सिंह आणि धनु राशीवर शनि ढिय्या प्रभाव आहे. तसेच ज्यांची शनि महादशा सुरू असेल, त्यांनी काही गोष्टी अवश्य कराव्यात, असे सांगितले जाते. महादेवांच्या शिवलिंगावर १०८ बेलपत्र आणि पिंपळाची पाने अर्पण करावीत. यासोबतच यथाशक्ती अन्नदान, शनिशी निगडीत वस्तुंचे दान करावे. साडेसाती सुरू असताना इष्टदेवतेचा जप करणे लाभप्रद ठरते. हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे. ११ वेळा शनि स्तोत्राचे पठण करावे. शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला गेला असल्यामुळे या कालावधीत आपले कर्म चांगले ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

 

Web Title: vaishakh somvati amavasya 2025 and shani jayanti 2025 know about shiv shani pujan vidhi and significance in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.